जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर येथील मध्यवस्तीत असलेल्या सुमारे दीडशे वर्षे पुरातन आणि ऐतिहासिक लक्ष्मी नारायण मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत मंदिराचे प्रचंड नुकसान झाले असून मंदिरातील पूजा साहित्यासह महत्त्वाचा भाग जळून खाक झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागली तेव्हा मंदिरात कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रावेर शहरातील हे लक्ष्मी नारायण मंदिर त्याच्या उत्कृष्ट आणि संपूर्ण लाकडी कोरीव बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. १५० वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराचे स्वरूप पूर्णपणे लाकडी असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दोन वाजेच्या सुमारास मंदिराच्या परिसरातून धूर आणि आगीच्या ज्वाला निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी तातडीने एकमेकांना जागे करत अग्निशामक दलाला पाचारण केले. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.रात्री उशिरापासून ते पहाटेपर्यंत आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर सकाळी या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मंदिराचे अतोनात नुकसान झाले होते.
आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसले, तरी प्राथमिक पाहणीत ही आग शॉर्ट सर्किटमुळेच लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे रावेर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.










