रावेरमध्ये बापाच्या हातातील दांडा लागून मुलाचा मृत्यू; आईच्या फिर्यादीवरून बापावर गुन्हा

मे 9, 2026 6:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दारूचे भयंकर व्यसन कसे हसते-खेळते संसार उद्ध्वस्त करते, याचे एक अत्यंत विदारक आणि मन सुन्न करणारे चित्र रावेर तालुक्यातील निमड्या येथून समोर आले आहे. दारूच्या नशेत वडिलांना मारण्यासाठी धावलेल्या मुलाचा, वडिलांसोबत झालेल्या झटापटीत डोक्याला लाकडी दांडा लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तब्बल १५ दिवसांनंतर मयत मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध (पित्याविरुद्ध) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. रमेश कैलास पावरा (वय १९) असे मृत मुलाचे नाव असून, कैलास रूपसिंग पावरा (वय ४०, रा. निमड्या, ता. रावेर) असे गुन्हा दाखल झालेल्या पित्याचे नाव आहे.या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

crime 2 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय रमेश हा बाहेरगावी कामाला गेला होता. तिथून तो गावी परतल्यानंतर वडील कैलास पावरा यांनी त्याला कष्टाच्या पैशांचा हिशोब विचारला. रमेशला दारूचे व्यसन असल्याने वडील त्याला समजावून सांगत होते की, “दारू पिऊन लोकांत फिरू नको, घराण्याची बदनामी करू नको.” मात्र, दारूच्या नशेत चूर असलेल्या रमेशला वडिलांचा हा सुप्रचार रुचला नाही. तो संतापला आणि रागाच्या भरात लाकडी दांडा घेऊन वडिलांना मारण्यासाठी धावला.

मुलगा आपल्यावर हल्ला करत असल्याचे पाहून कैलास पावरा यांनी स्वसंरक्षणार्थ रमेशच्या हातातील दांडा पकडला. यानंतर बाप-लेकामध्ये दांडा खेचण्यासाठी जोरदार ओढाताण आणि झटापट सुरू झाली. याच झटापटीत कैलास यांच्या हातातील दांडा अचानक निसटून रमेशच्या डोक्याच्या मध्यभागी जोरात लागला. हा फटका इतका भीषण होता की, रमेश जागीच रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला.

नातेवाइकांनी त्याला तातडीने गंभीर अवस्थेत इंदूर (मध्य प्रदेश) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

आईच्या फिर्यादीवरून पतीवर गुन्हा

ही दुर्दैवी घटना २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी घडली होती. उपचारादरम्यान रमेशचा मृत्यू झाल्यानंतर, ८ मे रोजी याप्रकरणी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार देण्यात आली. मयत रमेशची आई गेंदाबाई कैलास पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात त्यांचे पती कैलास रूपसिंग पावरा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now