⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मविप्र प्रकरण : माजी मंत्री आ.महाजनसह दोघांना दिलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । जळगावातील बहुचर्चित मविप्र : मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार ऍड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आ.महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. महाजन यांच्यासह दोघांविरोधात कठोर कारवाई करु नये असे आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत.

निंभोरा पोलीस ठाण्यातून वर्ग करून कोथरूड पोलीस ठाण्यात माजी मंत्री आ.गिरीश महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्या विरोधात धमकाविल्याचा गुन्हा दाखल आहे. याविरोधात दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जानेवारी 2018 मध्ये घडलेल्या कथित घटनेवर आता डिसेंबरमध्ये फिर्याद दिली आहे, असा युक्तिवाद महाजन यांच्या वतीने करण्यात आला आहे. बुधवारी न्या.प्रसन्ना वार्ले आणि न्या.अनिल किल्लोर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त ऍड.विजय पाटील यांनी ही तक्रार केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद येथे वर्ग करण्यात आली आहे. तीन वर्षापूर्वी घडलेल्या कथित घटनेवर आता फिर्याद केली आहे, त्यामुळे ती रद्द करण्यासाठी हे पुरेसे कारण आहे, असा दावा महाजन यांच्या वतीने करण्यात आला आहे.

दरम्यान, आ.महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. महाजन यांच्यासह दोघांविरोधात कठोर कारवाई करु नये असे आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे.