⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

एकता दौडमध्ये धावले जिल्हाधिकारी, महापौर, एसपी, आयुक्त!


जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. जळगावात जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयतर्फे सकाळी रन फॉर युनिटी-एकता दौडचे आयोजन करण्यात आले होतो. दौडमध्ये जिल्हाधिकारी अमन मित्तल, महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगांव द्वारा सरदार लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने सोमवारी सकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून रन फॉर युनिटी – एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये जिल्हाधिकारी अमन मित्तल, महापौर जयश्री महाजन, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित यांच्यासह अधिकारी, कर्मचारी वृंद, तरुण, तरुणी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. क्रीडा संकुलपासून सुरु झालेली रॅली शिवतीर्थ मैदान, स्टेट बँक चौक, बस स्थानक मार्गे पुन्हा क्रीडा संकुलात पोहचल्यावर समारोप करण्यात आला.

नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल अजिंक्य गवळी, स्वयंसेवक रोहन अवचारे, हेतल पाटील, गौरव वैद्य आदींनी सहभाग नोंदविला. नेहरू युवा केंद्रातर्फे जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांच्या माध्यमातून व ग्रामप्रशासन, स्थानिक युवा मंडळाच्या सहकार्याने सकाळी ७ ते ९ दरम्यान रन फॉर युनिटी – एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात प्रत्येक तालुक्यातील युवक – युवती, सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, नेहरू युवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी नोंदविला.