जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२३ । देशभरात केळी उत्पादनाबाबत जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरु आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच केळीवर यंदाही कुकंबर मोड़ोंक (सीएमव्ही) या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे ८ हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रावर या व्हायरसचा प्रादुर्भाव दिसत असून यामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, यावल, जळगाव या तालुक्यांमधील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड होत असते. त्यापैकी ८ हजार हेक्टर क्षेत्रावर काही प्रमाणात का असेना? सीएमव्हीचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना धड़की भरली आहे. तसेच सीएमव्हीसह जिल्ह्यात केळीवर करपा या रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. प्रशासनाकडून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केळी उत्पादक शेतक-यांकडून केली जात आहे.
कृषी विभागाकडून अलर्ट..
केळीवर करपासह सीएमव्हीचा देखील प्रादुर्भाव वाढल्यामुळे कृषी महासंचालक मोहन वाघ यांनी धुळे, नंदुरबार व जळगाव या तिन्ही जिल्ह्यातील कृषी अधीक्षकांना सीएमव्हीच्या वाढत्या प्रादुर्भावावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. केळी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
करपा रोगामुळे केळीची पाने पिवळी पडतात, त्यावर काही प्रमाणात काळसर डाग देखील पडतात. यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया थांबते व केळीची वाढ देखील खुंटते. यामुळे केळीच्या उत्पादनात देखील मोठी घट येते. सीएमव्ही हा एक व्हायरस असून, हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे. केळीमध्ये आंतरपीक घेतल्यामुळे हा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. बुरशीजन्य किवा इतर कोणतेही खते मारून देखील याचा प्रादुर्भाव कमी होत नाही, केळी उत्पादकांना झाड उपटून फेकून देण्याशिवाय अन्य पर्याय शेतकऱ्यांकडे नसतो