जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव शहरात भव्य ‘महाविजय रथयात्रा’ काढण्यात आली. शिवाजी पुतळ्यापासून सुरू झालेल्या या भव्य ‘रोड शो’ मध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. यावेळी नागरिकांनी उत्साहात मुख्यमंत्री आणि महायुती नेत्याचं स्वागत केलं.

शिवाजी पुतळ्यापासून निघालेली ही रथयात्रा नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टावर, चित्रा चौक आणि गोलाणी मार्केट अशा प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. या संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी आतिषबाजी केली. “मुख्यमंत्र्यांचा विजय असो, महायुतीचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. रॅलीच्या मार्गावर ठीकठिकाणी स्वागत करण्यात आले.

दरम्यान, या महाविजय रथयात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे संकटमोचक तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे उमेदवार सहभागी झाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त तैनात केला होता. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून नियोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक रोड शोमुळे प्रभाग क्रमांक १ ते १९ मधील राजकीय समीकरणे महायुतीच्या बाजूने पूर्णपणे झुकल्याचा दावा केला जात आहे.











