⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

भारनियमामुळे धानोरा परिसरातील नागरिक त्रस्त

पिकांचे नुकसान; पाणीपुरवठ्यावर परिणाम

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । एप्रिल मध्ये 45 अंश तापमान असून कडक उन्हाने हैराण झालेल्या जनतेला भारनियमनाचा चटका सहन करावा लागत आहे. शेतक-यांना या लोडशेडिंगमुळे शेतीला पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालून शेतात जावं लागत आहे. तसेच उद्योगधंद्यांना देखील याचा फटका बसू लागला आहे. याविषयी जनतेमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. भारनियमन चे वेळापत्रकच नसल्याने शेतकरी वर्ग व नागरिक फार वैतागले आहेत. तसंच सद्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून भारनियमन होत असल्याने त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पाणीपुरवठ्यावर परिणाम

गावातील पाणीपुरवठ्यावरदेखील या भारनियमनाचा परिणाम होत असून लोडशेडिंगमुळे पाण्याची टाकी भरली जात नसल्याने रात्री बेरात्री नळाला पाणी येत असल्याने महिला व नागरिकांची पुरेशी झोप होत नाही.परिणामी गावात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण होत असून सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी केली जात असून याठिकाणी पाणी भरण्यावरून वाद देखील होत आहेत.

शेतीशिवारात लोडशीडिंगमुळे पिकाचे नुकसान

लोडशीडिंगमुळे पिकाचे नुकसान होऊ लागले आहे. महावितरणकडून मोठया प्रमाणावर भारनियमन सुरू असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडले आहेत. सध्या महावितरणकडून मोठया प्रमाणावर भारनियमन चालू आहे त्यातच ऐन उन्हाळ्यात लाईट बंद होत असल्याने शेतकरी या भारनियमनाला वैतागले असून महावितरण व शासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे. दिवसभर वीज नसते त्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी रात्रीचे जागरण करावे लागते आहे. महावितरणच्या व शासनाच्या या सगळ्या कारभारावर शेतक-यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधीनि या भारनियमन वर योग्य ती उपाययोजना भारनियमन बंद कारवे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

लोडशेडिंग बंद करा

ता.३ एप्रिल पासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान या महिन्याला सुरुवात झाली असून महिनाभर चालणाऱ्या या सणाला मुस्लीम बांधव दिवसभर रोजा उपवास करून दिवसभर अन्न पाणी न घेता हा उपवास करत असतात परतू सध्या महावितरण कंपनी कडून वेळी अवेळी लोडशेडींग केली जात असल्याने याचा त्रास मुस्लीम बांधवांना सहन करावा लागत आहे. वर्षांतून एक वेळेस येणाऱ्या या मुस्लीम बांधवाच्या पवित्र सणाला महिनाभर लोडशेडिंग बंद करण्यात यावी अशी मागणी मुस्लीम बांधव करीत आहेत.