⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

चाळीसगावचे भयावह २४ तास : ५०० हून अधिक जनावरे वाहिली, ८०० घरे, ३०० दुकानांचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृढ पाऊस झाला असून लाखो नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. पुरात ५०० हुन अधिक जनावरे वाहून गेली असून दोघांचा पाण्यात बुडून तर एकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ७०० हुन अधिक घरांचे तर ३०० पेक्षा जास्त दुकानांचे नुकसान झाले आहे.

चाळीसगाव तालुका हा दूध उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. या मूळ दूध उत्पादक पट्ट्यात तडाखा बसल्याने ५०० हुन अधिक गुरे वाहून गेली असून इतर देखील काही गुरे मृत्युमुखी पडली आहेत. एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून एक अनोळखी मृतदेह वाहून आला आहे.

प्रत्येक गावात वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता व विस्तार/मंडळ अधिकारी असे पथक नेमून वैद्यकीय तपासणी, पाणीपुरवठा दुरुस्ती व शुद्धीकरण, मृत पशूंची शास्त्रीय विल्हेवाट, नुकसान पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे काम सुरू आहे. स्वच्छतेसाठी पंचायत समिती व नगरपालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक स्वतः सकाळपासून घटनास्थळी हजर असून गावांना भेटी देत आढावा घेत आहे. पंचनामे व तातडीची मदत यासाठी गतीने सूत्रे हलवण्याच्या स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

तात्पुरत्या निवाऱ्यातील नागरीकांसाठी मूलभूत सुविधाचे नियोजन प्रशासन व स्वयंसेवी संस्थाकडून करण्यात आले आहे. जीवनावश्यक किटचे वाटप सुरू असून समाजसेवी संस्थांची मदत येत आहे. तसेच चाळीसगांव शहरात ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे तेथील लोकांची तात्पुरती व्यवस्था ए.बी. हायस्कूल व उर्दु हायस्कुल चाळीसगांवमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे जेवणाची व्यवस्था चाळीसगांव नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे.

मुसळधार पावसामुळे पहाटे सुमारे रात्री २ वाजे दरम्यान कन्नड घाटात घाटात ७ ते ८ ठिकाणी दरड कोसळली. वाहतूक ठप्प होऊन त्यानंतर झालेल्या अपघातात एकाला जीव गमवावा लागला. प्रथम माहिती मिळाल्यावर रात्री ३ वाजता महामार्ग पोलीस व SDRF ला कळवण्यात आले. सकाळी सूर्योदयापूर्वी मदत कार्याला सुरूवात झाली असून प्रवाशांना सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. उद्या बुधवार सकाळपर्यंत घाट मोकळा होण्याची शक्यता असून त्यानंतर डागडुजी व दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील.

रात्री कन्नड घाट व डोंगरी परिसरात ढग फुटी सदृश पाऊस झाला असून तळेगाव मंडळात १४५ मिमी तर चाळीसगाव मंडळात ९० मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. चाळीसगाव शहरासह ७ गावांना पाण्याचा फटका बसला असून ७५० हुन अधिक घरांमध्ये तर ३०० पेक्षा जास्त दुकानात पाणी शिरले आहे. तालुक्यातील तितूर व डोंगरी नदीला पूर आलेला असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. पाचोरा आणि भडगाव तालुक्याला देखील काहीसा फटका बसला आहे.

नुकसानीचा प्राथमिक तपशील पुढीलप्रमाणे असून अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यातील ३२, पाचोरा ४ आणि भडगाव तालुक्यातील २ गावांना त्याचा फटका बसला आहे. चाळीसगाव तालुक्यात लहान १५५ तर ५०६ मोठ्या पशूंची हानी झाली आहे. चाळीसगावातील ६१७, पाचोरा ६ आणि भडगाव तालुक्यातील १४ घरांची अंशतः तर चाळीसगाव २० आणि पाचोरा तालुक्यातील १८ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. तसेच चाळीसगाव तालुक्यात ३०० दुकानांचे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे व फळपिकांचे एकूण १५ हजार ९१५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.