
जळगाव लाईव्ह न्यूज । पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२६-२७ जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, केळी व पपई या अधिसूचित फळपिकांना विविध हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.
या योजनेत अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी सहभागी होण्यास पात्र आहेत. तसेच कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही योजनेत सहभागी होता येईल. भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. फळपिकनिहाय अर्जाची अंतिम मुदत मोसंबी, केळी व पपई या पिकांसाठी ३१ ऑक्टोबर २०२६, संत्रा पिकासाठी ३० नोव्हेंबर २०२६, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर २०२६ आणि डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२७ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
योजनेत संत्रा, मोसंबी व डाळिंब पिकांसाठी अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान व गारपीट या हवामान धोक्यांचा समावेश आहे. केळी पिकासाठी कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा व गारपीट; आंबा पिकासाठी अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान व गारपीट; तर पपई पिकासाठी वेगाचा वारा, जास्त पाऊस व आर्द्रता, कमी तापमान, जास्त तापमान व गारपीट या हवामान धोक्यांपासून निर्धारित कालावधीत विमा संरक्षण देण्यात येणार आहे. निर्धारित हवामान निकष लागू झाल्यास नियमानुसार नुकसानभरपाई देय राहील.
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, सातबारा उतारा, जिओ टॅग केलेला फोटो तसेच ई-पीक पाहणी/डीसीएस नोंद असणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी/डीसीएस नोंद १०० टक्के बंधनकारक असून, ती नसल्यास विमा प्रस्ताव रद्द होऊ शकतो.
आंबिया बहारातील फळपिकांच्या विमा नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिसूचित फळपिकांचे हवामान धोके, विमा हप्ता व संरक्षण कालावधी यांची माहिती घेऊन नजीकच्या ई-सेवा केंद्र, बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधावा आणि विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहाराकरिता अधिसुचित फळपिकांना राबविण्यात येत आहे. अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असल्याने फक्त काही दिवस शिल्लक आहेत. तरी फळपिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे” असे कुरबान तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.





