
जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या तिसऱ्या फेरीअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांमध्ये एकूण ५७ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी मिळणार असून, प्रतिमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच इंटर्नशिपसाठी रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ६ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या एचडीएफसी बँक, एपीटी अँड कोप एलएलपी आणि भारत पेट्रोलियम या नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध आहेत. यासाठी बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवार पात्र आहेत.
इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन योजनेची माहिती घ्यावी व अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.





