जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या तरुणाचा पाल (ता.रावेर) येथील सुकी नदी पात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सुरेश सुमऱ्या बारेला (वय २५) या तरुणाचा मृतदेह आढळला. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रावेर तालुक्यातील पाल येथील वन प्रशिक्षण केंद्राच्याखाली, पाल गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला सुरेश बारेला या तरुणाचा मृतदेह आढळला. तो मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील कसोटी येथील रहिवासी असून, सध्या कामानिमित्त एरंडोल तालुक्यातील दापूर येथे वास्तव्याला होता. प्राथमिक अंदाजानुसार त्याचा मृत्यू २५ मार्च दुपारी १२ ते २६ मार्च सकाळी १० वाजेच्या दरम्यान झाला असावा, असे तपासणीनुसार सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी चिंपी सुरेश बारेला यांच्या दिलेल्या माहितीनुसार रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. डॉ. वैभव गिरी यांनी शवविच्छेदन केले असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.