⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

रक्तपिपासू जळगावचे रस्ते…

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील रस्ते आणि दररोज होणारे अपघात हे काही आता नवीन राहिलेले नाही पण बुधवारी मोहाडी रस्त्यावर झालेल्या अपघातात सुजय सोनवणे या चिमुकल्याचा अपघातात बळी गेला आणि मन हेलावले. ज्या कोवळ्या जिवाने जग पाहिले नाही त्याचा काय दोष होता कि त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. दोष त्याचा नव्हताच दोष होता तो खराब रस्त्यांचा आणि सडक्या राजकीय मनोवृत्तीचा. सोशिक जळगावकर आणि राजकीय मिलीभगत असल्याने ना रस्ते तयार झाले आणि ना रोज जाणारे जीव थांबले. राजकारणी तर आहेतच पण प्रशासन देखील टेकू दिल्याशिवाय हालत नसल्याने सर्वच रखडत चालले आहे. आज गेलेला सुजयचा जीव सोशिक जळगावकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहून रस्त्यावर जनआक्रोश मोर्चाचा रूपाने उभा राहिला तरच इतरांचे जीव वाचू शकतील.

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी शेकडो नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागतो. कुठे रस्त्यांच्या साईडपट्ट्या जीव घेतात तर कुठे वाहनांचा मर्यादेपेक्षा अधिक असलेला वेग. बहुतांशवेळी मद्यपान करून वाहन चालविल्याने बळी जातो तर काही वेळी नियमांचे पालन न केल्याने. काही मिनिटांचा वेळ वाचविण्याच्या प्रयत्नात ओव्हरटेक करताना सर्वाधिक अपघात होतात. जळगावात गेल्या दोन वर्षांपासून अनेक तालुक्यात अमृत योजनेचे काम सुरु असल्याने रस्त्यांचे दुरवस्था झाली आहे. महामार्ग, राज्यमार्गाची अनेक ठिकाणी कामे सुरु असल्याने ठिकठिकाणी चढउतार, कच्चा आणि नवीन रस्ता अशी गफलत होत असल्याने देखील अपघात होत असतात.

जळगावात शहरात आणि जिल्ह्यात रस्त्यांमुळे अनेक अपघात घडले व शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी जळगाव शहरात घडलेल्या अपघातात के.सी.पार्क परिसरात रस्त्याचे काम सुरु असताना ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दोघांना जीव गमवावा लागला. नेरी नाकाकडून कासमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे सायकल घसरल्याने एका प्रौढाला ट्रॅक्टरखाली जीव गमवावा लागला. गेल्या वर्षी तर जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचा देखील खड्ड्यामुळे अपघात झाला होता. जिल्ह्यात अनेक भीषण अपघात झाले आणि कितीतरी नागरिकांनी जीव गमावला.

जिल्ह्यातील अपघातांची मालिका थांबविण्यासाठी पोलिसांनी, उपप्रादेशिक परिवहन विभागाने देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्हाभरात सुरु असलेली अवैध प्रवासी वाहतूक, नियमांचे पालन न करता धावणारी हजारो वाहने आणि त्यामुळे घडणारे अपघात याला सर्वस्वी हेच विभाग जबाबदार असू शकतात. मूळ विषय म्हणजे रस्त्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी अगोदर चांगल्या दर्जाचे आणि गुणवत्तेचे रस्ते जळगावकरांना देणे आवश्यक आहे. आपल्याकडे पुढारी आपल्याच चमच्यांना मक्ता मिळवून देतात. ठरवून मिलीभगत असल्याने पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यांची खरडपट्टी निघते.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत आणि राजकीय अनास्था हीच खरी नागरिकांच्या अपघाती मृत्यूला जबाबदार आहे. जळगावकर नागरिकांनी आपल्या आप्तेष्ठांच्या मृत्यूसाठी राजकारणी, प्रशासकीय अधिकारी यांना दोषी ठरवत त्यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा. नुकतेच न्यायालयाने देखील रस्ते आणि जळगावच्या परिस्थितीबाबत प्रशासनाला अवगत केले असून एप्रिलपर्यंत याबाबत अहवाल देण्याचे निर्देश दिलेले आहेत. सुजयचे आपल्यातून निघून जाणे व्यर्थ न जाऊ देता जळगावकर भ्रष्ट्राचार करणाऱ्या आणि राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवतील हे नक्की..!