⁠ 
रविवार, मे 5, 2024

लढ्ढा फार्म हाऊसच्या कार्यालयामधून हजारोंची रोकड चोरीला ; एकावर गुन्हा दाखल

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । जळगावातील अजिंठा चौकातील लढ्ढा फार्म हाऊसच्या कार्यालयातील लॉकरमधून ५० हजाराची रोकड चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गोविंद आधार पवार (रा.रामेश्वर कॉलनी) याच्याविरुधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की कपिल प्रदिप लढ्ढा (वय-२९ रा. लढ्ढा फार्म हाऊस, अजिंठा चौक, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. लढ्ढा फार्म हाऊस चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास लढ्ढा फार्म हाऊसचे कार्यालय उघडे असतांना संशयित आरोपी गोविंद आधार पवार रा.रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव याने कार्यालयात येवून चावी घेवून लॉकरमधून ५० हजारांची रोकड काढून घेतली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर कपील लढ्ढा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार बुधवार १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोविंद आधार पवार रा.रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील हे करीत आहे.

12वी पाससाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी ; तब्बल 3700+ जागांवर महाभरती

0

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही केंद्रीय नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत महाभरती जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभाग/मंत्रालयांमध्ये कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) आणि डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ सारख्या पदांवर नियुक्त्या होतील.

या भरतीद्वारे तब्बल 3712 जागा भरल्या जातील. त्यानुसार पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 पर्यंत आहे. तर 10 आणि 11 मे रोजी अर्जातील दुरुस्ती करता येईल.

पदाचे नाव
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 3712
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा

इतका पगार मिळेल :
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – वेतन स्तर-2 (रु. 19,900-63,200).
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) -पे लेव्हल-4 (रु. 25,500-81,100) स्तर-5 (रु. 29,200 – 92,300/-)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’वेतन स्तर-4 (रु. 25,500-81,100)

वय मर्यादा
वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे. SC/ST ला 5 वर्षांपर्यंत, OBC 3 वर्षांनी, PwBD (अनारक्षित) 10 वर्षांनी, PwBD (OBC) 13 वर्षांनी आणि PwBD (SC/ST) यांना 15 वर्षांनी कमाल वय सूट दिली जाईल. अधिक माहितीसाठी सूचना पहा.
अर्ज फी :
अर्जाची फी रु 100 आहे. महिला उमेदवार, SC/ST, अपंग, माजी सैनिकांसाठी अर्ज विनामूल्य आहे.
निवड प्रक्रिया :
एसएससी सीएचएसएलमध्ये दोन टप्प्यातील लेखी परीक्षा असेल – टियर-1 आणि टियर-2. दोन्ही परीक्षा संगणकावर आधारित असतील. टियर-1 पेपरचे चार भाग असतील. प्रत्येकी 25 प्रश्न असतील. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. परीक्षेत ०.५० गुणांचे निगेटिव्ह मार्किंगही असेल. तर टियर-2 परीक्षेत दोन सत्रे असतील. पहिले सत्र लेखी परीक्षेचे असेल आणि दुसरे सत्र कौशल्य चाचणी/टायपिंग चाचणीचे असेल.
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online 

लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार ; संशयित तरुणावर गुन्हा दाखल

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । तरुणी-महिलांना लग्नाचे आमिष देऊन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना जळगाव शहरातून समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवत २३ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला. याबाबत संशयित विकास प्रकाश अडकमोल (वय २३ रा. गेंदालाल मिल, जळगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?
जळगाव शहरातील एका भागात २३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ८ मार्च २०२३ रोजी महिलेची ओळखी विकास प्रकाश अडकमोल रा. गेंदालाल मिल, जळगाव याच्याशी झाली. विकासने महिलेचा ओळखीचा फायदा घेत जवळीक साधली. त्यानंतर तिला लग्नाने आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.

हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पिडीत महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून विकास अडकमोल याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी १ मे रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी विकास प्रकाश अडकमोल याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे हे करीत आहे.

गोदावरी अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनात एम्बेडेड हब सेल आणि एम्बेडेड हब लॅबचे उद्घाटन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे एम्बेडेड हब सेल व लॅबचे उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळी एम्बेडेड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, इलेक्ट्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीज् चे संस्थापक सीईओ श्री निलेश वाघ आणि श्री राजेश ठाकरे यांच्या हस्ते एम्बेडेड हब सेल आणि एम्बेडेड हब लॅबचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), एम्बेडेड हब कार्यक्रम समन्वयक प्रा. विजय डी चौधरी (अभियांत्रिकी) आणि प्रा. कृष्णा पाटील (तंत्रनिकेतन) तसेच प्रा. तुषार कोळी (समन्वयक, आयक्यूएसी), प्रा. अतुल बर्‍हाटे (कन्व्हेनर, आयआययसी), प्रा. दिपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन) आणि महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व सर्व विभागातील विद्यार्थी हे उपस्थित होते.

समन्वयक प्रा. विजय डी चौधरी यांनी प्रास्ताविक करताना एम्बेडेड हबची एकल कल्पना, दृष्टिकोन आणि विशिष्ट साध्य तसेच संक्षिप्त उद्दिष्टे स्पष्ट केली.उद्घाटनपर भाषणात निलेश वाघ यांनी एम्बेडेड हब स्थापित करण्यामागील हेतू तसेच त्यात विद्यार्थ्यांना होणारे फायदे विषद करीत विद्यार्थ्यांनी कोडींग कौशल्याचा सराव केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच नवनिर्मितीची विचार क्षमता वाढेल. तसेच त्यांनी स्वयंचलित पी एल सी ऑटोमेशन आणि त्याचे प्रोग्रामिंग कौशल्य यावर प्रकाशझोत दिला शिवाय पी एल सी ऑटोमेशन प्रोग्रामिंग कौशल्य शिकवलेे. राजेश ठाकरे, संस्थापक सीईओ इलेक्ट्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीज् जळगाव, यांनी एम्बेडेड प्रोसेसर ची प्रोग्रामिंग, त्याचे प्रशिक्षण आणि कार्यशाळा याचे महत्त्व विशद केले आणि नोकरीच्या संधी संशोधन आणि विकास या क्षेत्रामध्ये कशा मिळवाव्यात बद्दलचे मार्गदर्शन केले.

News2

गरजेचे प्रोग्राम कोडींग चे कौशल्य आत्मसात करून एम्बेडेड प्रणाली कशा विकसित होऊ शकतात तसेच त्यांनी ऑर्डिनो मायक्रोकंट्रोलर आणि रास्पबेरी पाय प्रोसेसर प्रोग्रामिंग इंटरफेस याबद्दलचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सुनिश्चित केले की एम्बेडेड हब अंतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान मिळेल व त्यांनी विद्यार्थ्यांना, एम्बेडेड हब या प्रक्रियेचा भाग व्हावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने या क्षेत्रामध्ये निष्णात व्हावे असे सुचित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सोळंके आणि सेजल सातव (द्वितीय वर्ष ) यांनी केले.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजी) यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता) यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. पूजा दुबे, प्रा. धनश्री पवार (तंत्रनिकेतन) तसेच प्रा. हेमराज व्ही धांडे, प्रा. महेश एन पाटील (अभियांत्रिकी) यांचे सहकार्य लाभले.

Xiaomi ने Redmi Note 13 सीरीजच्या किमती केल्या कमी, आता ‘इतक्या’त मिळतोय..

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । तुम्ही जर नवीन Xiaomi कंपनीचा स्मार्ट फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Xiaomi भारतात तिचा 10 वा वर्धापन दिन साजरा करत असून या निमित्ताने, कंपनीने भारतात Redmi Note 13 Pro+ चे वर्ल्ड चॅम्पियन्स संस्करण लॉन्च केले आहे. याशिवाय, ब्रँडने Redmi Note 13 सीरीजच्या किमतीही कमी केल्या आहेत. या मालिकेत तीन स्मार्टफोन आहेत: Redmi Note 13, Note 13 Pro आणि Note 13 Pro+.

ब्रँडने या फोनच्या किमती 1,000 रुपयांनी कमी केल्या आहेत. बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफर एकत्र करून, तुम्ही ही मालिका आकर्षक किंमतीत खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया…

Redmi Note 13 5G मालिकेवर बंपर ऑफर
Xiaomi ने Redmi Note 13 5G सीरीजच्या सर्व फोनच्या किमती कमी केल्या आहेत. कट केल्यानंतर, तुम्ही Redmi Note 13 Pro+ 5G 27,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकाल. तर तुम्ही सर्व सवलतींनंतर Redmi Note 13 Pro 5G Rs 21,999 मध्ये खरेदी करू शकता.

Redmi Note 13 5G सीरीजच्या सर्व प्रकारांची किंमत 1000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. याशिवाय या फोनवर 3000 रुपयांपर्यंतच्या बँक ऑफरही उपलब्ध आहेत. ही ऑफर ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर उपलब्ध आहे. हे फोन तुम्ही Flipkart, Amazon आणि Mi.com वरून खरेदी करू शकाल.

नवीन दर काय आहेत?
नवीन किमतींबद्दल बोलायचे झाले तर, Redmi Note 13 5G चा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट आता Rs 16,999 मध्ये येतो. त्याचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 18,999 रुपयांना येतो, तर 12GB RAM + 256GB स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 20,999 रुपयांमध्ये येतो. या सर्वांवर 1500 रुपयांची स्वतंत्र बँक सूट उपलब्ध आहे.

तर Redmi Note 13 Pro 5G चा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 24,999 रुपयांना येतो. त्याच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये झाली आहे, तर 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंट आता 28,999 रुपये आहे. यावर 1500 रुपयांची बँक ऑफर देखील उपलब्ध आहे.

शेवटी, जर आपण Redmi Note 13 Pro+ 5G बद्दल बोललो तर त्याचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 30,999 रुपयांमध्ये येतो. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे. यावर 3000 रुपयांची बँक ऑफर उपलब्ध आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘समन्वय’चा जल्लोषात समारोप

0

कलाकृती सादर करीत विद्यार्थ्यांनी केली प्रचंड धम्माल

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित समन्वय २०२४ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, कथ्थक, पंजाबी, गुजराथी नृत्य आणि मराठमोळ्या लावणीद्वारे कलाविष्कार सादर करीत प्रचंड धम्माल केली. सांस्कृतिक कार्यक्रमांनी समन्वयचा जल्लोषात समारोप करण्यात आला.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात समन्वय २०२४ या सात दिवसीय स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. तब्बल पाच दिवस आयोजित करण्यात आलेल्या समन्वय २०२४ कार्यक्रमात आर्टगॅलरी, प्रोम नाईट, होम बॅण्ड, टीचर आणि जे आर नाईट, डि.जे नाईट आणि फनफेअर, कॉन्सर्ट आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

दि. ३० रोजी समन्वय २०२४ चा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती गोदावरी पाटील, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, पद्मश्री रवींद्र कोल्हे, डॉ. सुहास बोरले, अनिल पाटील, डिन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत आदि मान्यवर उपस्थित होते.

डान्स, गीतांनी केली धम्माल
समन्वय २०२४ च्या समारोपीय समारंभाच्या सुरूवातीला कथ्थक साक्षी संचेती आणि चेतश्री चोरडीया, भरतनाट्यम सृष्टी सोनपसारे हिने सादर करून चाहूल गीताने सुरूवात झाली. त्यानंतर जोगवा, पंजाबी, गुजराथी, दक्षिण भारतीय आणि मराठमोळ्या लावणीने कार्यक्रमात रंगत आणली. तसेच फ्रीस्टाईल नृत्य समन्वयक समीर इद्रिसी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. हिपहॉप, बॉलीवूड, सालसा, इनव्हीक्टस बॅच नृत्य, फनी नृत्य, शौर्य बॅच नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समन्वयच्या आठवणींना उजाळा देत प्रचंड धम्माल केली. ज्युनीअर रेसीडेंट डॉक्टरांनीही यावेळी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वजिहा खान, राजनंदिनी पाटील, चाहूल मानकर, सानिका कोपणे, निखील जाधव, संस्कृती जाधव, खुशी सुराणा, प्राजक्ता रेले यांनी तर आभार विश्‍वजीत रहंगाडे या विद्यार्थ्याने मानले. यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे आदीत्य फेगडे, संदेश घुले, नुतेश बेले, निर्मीती भिरूड, चाहूल मानकर, तेजस चाटे, साहील अवताडे, ललीत सोनार, सृष्टी सोनपसारे यांनी परिश्रम घेतले.

कामगार दिनानिमित्त स्मिताताईंनी साधला सफाई कामगारांसोबत संवाद

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जळगाव शहरातील गुरुनानक नगर, शनिपेठ येथे जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार स्मिताताई वाघ यांनी सफाई कामगारांसोबत संवाद साधला. यावेळी स्मिताताईद्वारे गुलाबपुष्प त्यांचे स्वागत करण्यात आलं. या स्मितसंवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार उपस्थित झाले होते.

यादरम्यान, स्मिताताई वाघ यांनी कामगारांना केंद्र सरकारच्या असलेल्या शिक्षण, आरोग्य, विमा याबद्दलच्या योजनांबद्दल संक्षिप्तरित्या माहिती सांगितली. यावेळी नगरसेवक चेतन सनकत,युवा सेना महानगर अध्यक्ष हर्षल मावळे,भाजप मंडळ २ अध्यक्ष राहुल घोरपडे,शिवसेना समन्वयक सोहम विसपुते,मेहतर समाज पंचायत चे प्रमुख संजय सनकत,तरुण अटवाल,शशी ढंडोरे,रामदास,बारसे प्रमोद चांगरे,विजय चंडाले,दिगंबर घेंगट,रमेश धवलपुरे,कुमोद चांगरे,प्रकाश सनकत,रामदास बेंडवाल,घनश्याम चावरिया,दिनेश करोसिया,बापू शिंदे व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आनंदवार्ता ! सोने-चांदीने घेतली माघार, भावात झाली एवढी घसरण..

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । मार्चनंतर एप्रिल महिन्यात सोन्यासह चांदीच्या किमतीने विक्रमी टप्पा गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र आता सोने तोंडावर आपटले तर चांदीने माघार घेतली. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याला उंच भरारी घेता आली नाही. मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीचे दर खाली येताना दिसत आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पहा आजचे भाव..

या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी घसरले. तर 30 एप्रिल रोजी त्यात बदल दिसला नाही. 1 मे रोजी सोने 1,000 रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दुसरीकडे चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास 29 एप्रिल रोजी किंमती स्थिर होत्या. तर 30 एप्रिल रोजी चांदी किलोमागे 500 रुपयांनी स्वस्त झाली. 1 मे रोजी त्यात तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,000 रुपये आहे.

उष्णतेपासून दिलासा नाहीच! IMD कडून मे महिन्यातील तापमानाचा अंदाज जाहीर

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात प्रचंड उष्णतेने कहर केला आहे. अनेक शहरातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली असून नागरिक अक्षरक्ष: हैराण झाले आहे. यातच भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मे महिन्यातील स्थितीचा अंदाज व्यक्त केला असून तो फारसा दिलासादायक नाही. मे महिन्यात देशभरात तापमान चढेच राहील असं सांगण्यात आलं आहे

दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ईशान्य, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात मे महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यासह गुजरातमध्ये मे महिन्यात आणखी पाच ते आठ दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. आयएमडी प्रमुख मृत्यूजंय महापात्र यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

पुढील काही दिवस तापमान साधारणपेक्षा जास्तच असणार आहे. कोकणातील काही भागात उष्णतेची लाट आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील तापमान जास्त राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसासंदर्भात अंदाज
आयएमडी प्रमुखांनी सांगितलं की, मे महिन्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम भारतातील अनेक भाग, मध्य भारताचे काही भाग, नॉर्थ ईस्ट भारतात पासवाची स्थिती सामान्य ते जास्त असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि तमिळनाडूमध्ये देखील अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. येथे सामान्य ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.