⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

भयंकर ! दुचाकी घसरल्याने माय-लेकाला मागून येणाऱ्या टँकरने चिरडले

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. अशातच पारोळा तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्राचा लग्नसमारंभ आटोपून एरंडोल येथे मामाच्या भेटीला जाण्यासाठी निघालेल्या डॉक्टर परिवाराचा अपघात झाला. खराब रस्त्यामुळे दुचाकी घसरल्याने डॉक्टरसह त्यांची पत्नी व मुलगा खाली पडले. त्यात डॉक्टरांच्या पत्नी व मुलास मागून येणाऱ्या टँकरने चिरडल्याने दोघा मायलेकाचा जागीच मृत्यू झाला तर डॉक्टर हे जखमी झाले आहेत.

ही भयंकर घटना पारोळ्यातील सारवे-बाभळे नाग फाट्यादरम्यान घडली. नंदुरबार जिल्ह्यातील कुकावल (ता. शहादा) येथील गुरांचे डॉक्टर प्रतीक सुनील पाटील (३०) हे पत्नी पूनम प्रतीक पाटील (२४) व अगस्त प्रतीक पाटील (१ वर्षे) यांच्यासह पारोळा तालुक्यातील चिखलोड येथे आपल्या मित्राच्या लग्न समारंभासाठी आले होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर ते दुचाकीने (एमएच ३९ एएच ०७०४) एरंडोल येथे मामाच्या घरी निघाले होते.

मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पारोळा तालुक्यातील सारवे, बाभळे नाग फाट्यादरम्यान अपघात झाला. उन्हामुळे डांबर निघून खडी वर आली होती. त्या ठिकाणी दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या टँकरचे (एमएच ४० सीटी ४०९७) चाक पूनम व अगस्त यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. प्रतीक हे विरुद्ध दिशेला पडल्याने ते बचावले.

आनंदवार्ता ! सोने 1900 रुपयाने तर चांदी 3 हजारांनी घसरणी ; जळगावात आता काय आहे भाव?

0
प्रतीकात्मक फोटो

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । सोने चांदी खरेदी (Gold Silver Rate) करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव सुवर्णनगरीत गेल्या दोन दिवसात सोने दरात १९०० रुपयाची घसरण झाली तर चांदी दरात तब्बल ३००० हजार रुपयाची घसरण झाली आहे.

मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत सोने-चांदीच्या किमतीत धुवांधार बॅटिंग सुरु आहे. त्यातच इराण आणि इस्त्राईलमध्ये तणाव वाढल्याने सोन्यासह चांदीच्या किंमतींनी ऐतिहासिक टप्पा गाठला. गेल्या आठवड्यात जळगावात सोन्याचे दर विनाजीएसटी ७४२०० रुपये (१७ एप्रिल)प्रति तोळा या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. तर चांदीचा दर विनाजीएसटी ८४००० रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. यामुळे ऐन उन्हाळ्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा घाम फोडला.

रामनवमीला सोने आजवरच्या उच्चांकी ७४२०० (जीएसटीसह ७६४३०) रुपये तोळ्यावर पोहोचले होते. शनिवार (दि २०) आणि रविवार (दि २१) यात १०० रुपयांची किरकोळ घसरण झाली. सोमवारी (दि २२) बाजार उघडला तेव्हा दरात ७०० रुपयांची घसरण होत ७३४०० रुपये तोळा झाले. त्यापाठोपाठ काल मंगळवारी आणखी १२०० रुपयांनी भाव कमी झाले आणि सोने ७२२०० रुपये प्रति तोळा झाले आहे.

दरम्यान, सोन्याच्याच दरात घसरण झाली नाही, तर चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. चांदीच्या दरात जवळपास ३००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सराफा बाजारात चांदीचा दर हा विनाजीएसटी ८१००० रुपये किलो आहे. यापूर्वी दोन दिवसापूर्वी सोमवारी सकाळी चांदीचा दर हा ८४००० रुपये किलो होता. दरम्यान, अक्षय तृतीयेचा सण जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळं सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा मिळाला आहे. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जळगावात दाखल

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असून आज आणि उद्या महाविकास आघाडी व महायुतीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. २४ व २५ एप्रिल रोजी अनुक्रमे महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातील. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत जळगावात दाखल झाले आहे.

जळगाव विमानतळावर त्यांचे ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह जळगाव मनपाचे माजी महापौर भाग्यश्री महाजन आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह आदींनी स्वागत केलं. लोकसभा निवडणुकीसाठी खऱ्या अर्थाने बुधवारपासून वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.

महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला सोडचिट्टी देऊन ठाकरे गटात गेलेले करण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून जळगावमधून भाजपने स्मिताताई वाघ तर रावेरमधून रक्षा खडसेंना उमेदवार जाहीर केली आहे.२४ व २५ एप्रिल रोजी अनुक्रमे महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातील. त्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

जळगावच्या तापमानात पुन्हा वाढ ; ‘या’ तारखेनंतर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे संकेत

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । सध्या महाराष्ट्रात दुहेरी हवामान अनुभवायला मिळत आहे. एकीकडे काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले तर दुसरीकडे वादळी पावसाने अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडलं आहे. आजही राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगावात आठवड्याभरात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तविण्यात आला आहे.

उत्तर, दक्षिणेकडून हवामानात झालेल्या बदलामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून जळगाव शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला. यानंतर मंगळवारी आभाळ स्वच्छ असल्यामुळे पुन्हा तापमान चाळिशीपार गेले. अर्थात, सोमवारच्या तुलनेत ते चार अंशांनी वाढले.

मंगळवारी शहराचे तापमान ४०.८ अंशांवर होते. आता २४ ते २७ एप्रिल दरम्यान, कमाल तापमान ४० ते ४२ अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. मात्र २७ एप्रिलनंतर पुन्हा उष्णतेच्या लाटेचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे एप्रिलचा शेवट आणि मे महिन्याची सुरुवात ही अत्यंत तापदायक राहण्याचा अंदाज आहे. रविवारी व सोमवारी असलेले ढगाळ वातावरण मंगळवारी पूर्णपणे निवळल्याने तापमान वाढून उकाडा असह्य झाला

आज राज्यात कुठे ऊन, तर कुठे पाऊस
भारतीय हवामान विभागाने आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिलेला आहे. तर नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीराजवळ घडली. सुभाष रामराव घोडकी (४०) आणि त्यांची पत्नी सोनूबाई सुभाष घोडकी (३४) दोन्ही रा. निमखेडी खुर्द (ता. मुक्ताईनगर) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. पघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहन घेवून घटनास्थळावरून पसार झाला असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात सुभाष घोडकी आणि त्याची पत्नी सोनुबाई घोडकी हे वास्तव्याला आहे. दोघे पतीपत्नी हे मध्यप्रदेशातील फोपनार येथे नातेवाईकांकडे दुचाकीने गेले होते. मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ते निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ इएफ ९२११) ने निघाले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीरासमोरून जात असतांना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात सुभाष घोडकी आणि सोनूबाई घोडकी हे दाम्पत्य ठार झाले. तर अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक हा वाहन घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी मयताचा पुतण्या प्रविण मोतीलाल घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे निमखेडी खुर्द गावात हळहळ व्यक्ती केली जात आहे.

आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी काहीसा कठीण जाईल ; वाचा बुधवारचे राशिभविष्य

0

मेष – तुम्ही सहकार्याची अपेक्षा कराल, तर ग्रहांची स्थिती विरुद्ध कार्य करत असल्यामुळे लोक तुमची मदत नाकारतील. व्यापारी वर्गाला विरोधकांपासून सावध राहावे लागेल, कारण ते तुमच्या कामातील वाटा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मोठा विजय आणि यश मिळवण्यासाठी तरुणांना मर्यादित व्याप्तीच्या बाहेर विचार करावा लागेल.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी हुशार आणि धूर्त लोकांपासून सावध राहावे लागेल. व्यापारी वर्गाच्या परिस्थितीचा जटिल दृष्टिकोन घेण्याऐवजी लवचिक आणि अंतर्ज्ञानी विचार ठेवा. यशाच्या इतक्या जवळ आल्यानंतर आता तरुणांनी आळस दाखवणे टाळावे लागेल, कारण आळस तुमच्या येणा-या यशाकडे पाठ फिरवू शकतो.

मिथुन – या राशीच्या लोकांनी गुंतागुंतीच्या कामात व्यस्त राहू नये, अन्यथा तुमचा वेळ वाया जाईल आणि कामे पूर्ण होणार नाहीत. मन आणि मेंदू तुम्हाला पुन्हा विचार करण्यास भाग पाडू शकतात, परंतु तुम्हाला तुमच्या निर्णयांवर ठाम राहावे लागेल. तुमच्या जोडीदाराप्रती आपुलकी दाखवण्याची गरज आहे, त्यांना असे वाटू देऊ नका की तुमचे काम आणि इतर मित्र तुमच्यासाठी त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत..

कर्क – कर्क राशीच्या लोकांनी मार्केटिंगशी संबंधित कामात अधिक लक्ष द्यावे आणि कोणत्याही फोन कॉलकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे टाळा आणि जेवढा साठा वापरला जातो तेवढाच खरेदी करा. विद्यार्थ्यांचे यश इतर लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल, लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. दिखावा करणाऱ्या लोकांच्या प्रभावाखाली येण्याचे टाळा कारण यामुळे तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता. ज्यांना नृत्य आणि संगीताची आवड आहे त्यांनी ते चालू ठेवावे कारण याद्वारे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहू शकाल.

सिंह – या राशीच्या लोकांनी मनोबल उंच ठेवावे आणि गरज पडल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. व्यापाऱ्यांनी संयम बाळगावा कारण आज व्यवहारात थोडा विलंब होऊ शकतो. तरुणांनी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी, मेहनतीनंतरच खरे यश मिळेल. पाहुण्यांच्या आगमनासाठी तयार रहा, लोक तुम्हाला आश्चर्यचकित करण्याच्या उद्देशाने तुमच्या घरी येऊ शकतात. आजारपणाबद्दल विचार करून तुम्ही जास्त चिंतित व्हाल पण प्रत्यक्षात तुम्ही इतके आजारी नाही.

कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस काहीसा कठीण जाईल, त्यांना ओव्हरटाईम देखील करावा लागू शकतो. तुम्ही प्रवासात उशीर करत असाल तर पुढे ढकलू नका, आजचा प्रवास फायदेशीर ठरेल. तरुणांनी आपले प्रयत्न सुरू ठेवावेत, तुम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला असेल तर तुमचा विजय निश्चित आहे. परंपरेला आणि रूढीवादी लोकांना विरोध करून अनेकांना तुमचा राग येऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही तणावापासून दूर राहिल्यास तुमचे आरोग्य लवकरच सुधारेल.

तूळ – या राशीचे लोक वरिष्ठांच्या मदतीने आपली कामे पूर्ण करू शकतील. व्यावसायिकांना सल्ला दिला जातो की ते योग्य वाटत नसलेल्या व्यवहारांना अनिच्छेने सहमती देणे टाळावे. लोकांना मदत करण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या प्राधान्यांकडे दुर्लक्ष करू शकता. कौटुंबिक वाद थोड्या प्रयत्नाने सोडवले जाऊ शकतात, याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला घशात काही प्रकारचे दुखणे किंवा संसर्ग जाणवू शकतो, जर तुम्ही कोमट पाण्याने कुस्करत राहिल्यास तुम्हाला लवकर आराम मिळेल.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांना महिला सहकाऱ्यांची साथ मिळेल, अशा परिस्थितीत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे तुमचे कर्तव्य आहे. नवीन व्यवसायाशी संबंधित माहिती गोळा करा आणि मगच या दिशेने पुढे जा. तरुणांनी रंजक उपक्रमांसाठी वेळ द्यावा, यातून थोडा वेळ का होईना, तुमचा मूड वळेल आणि तुम्हाला तणावमुक्त वाटेल. आज तुमचे सामाजिक जीवन व्यस्त असेल, तुम्ही घरातील कामातही व्यस्त दिसाल. ब्लड इन्फेक्शन किंवा कमी हिमोग्लोबिन यांसारखे रक्ताशी संबंधित आजार होण्याचीही शक्यता आहे, आरोग्याची काळजी घ्या.

धनु – या राशीचे लोक जे शिक्षक आहेत त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांकडून तसेच त्यांच्या पालकांकडून आदर मिळेल. अन्न व्यवसायात काम करणारे लोक ग्राहकांच्या तक्रारी ऐकू शकतात. चांगल्या संगतीचा व्यापक प्रभाव तरुणांमध्ये दिसून येईल, तुम्हीही तुमच्या मित्रांसारखे किंवा सहकाऱ्यांसारखे बनण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनातील समस्यांवर तुम्ही मात करू शकाल; तुमच्या जोडीदाराच्या ज्या काही तक्रारी आणि तक्रारी होत्या त्या दूर केल्या जातील. आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस संमिश्र जाईल, तुम्ही तुमच्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकाल.

मकर – मकर राशीच्या लोकांनी त्यांच्या चुकांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरणे टाळावे. व्यावसायिकांनी पैशाच्या शुद्धतेची काळजी घ्यावी, कोणतेही अनैतिक काम करू नये किंवा अतिरिक्त पैसे उकळू नये. तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधाबाबत गंभीर असाल, परंतु ते सर्वोपरि ठेवणे आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. मुलांच्या समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा, शिव्या दिल्याने त्यांचे मनोबल कमी होऊ शकते. तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी ध्यान सोडू नका, आज शांत राहणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल.

कुंभ – या राशीच्या लोकांनाही रोजच्या थकव्यापासून आराम मिळेल. व्यापारी वर्गाने काम बदलण्याचा विचार पुढे ढकलणे, सध्याची व्यावसायिक परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल. दिवस शुभ आहे, त्यामुळे वेळ वाया घालवू नका आणि प्रलंबित काम सुरू करा. तुम्हाला न आवडणाऱ्या घरातील गोष्टी आणि व्यवस्थेत बदल दिसतील. आरोग्य चांगले आहे आणि संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे, आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांसह दिवसाचा आनंद घ्या.

मीन – मीन राशीच्या लोकांनी शिस्तीने काम करावे कारण तुम्ही बॉसच्या नजरेत आहात, त्यामुळे जबाबदाऱ्यांबाबत सतर्क राहा. व्यापारी वर्गाला उत्पन्नात चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम करणे आणि पुनरावृत्तीचे कामही करत राहणे आवश्यक आहे. जोडीदाराशी बोलताना शब्दांचा योग्य वापर करा, नाहीतर तुमच्या दोघांमध्ये मतभेद व्हायला वेळ लागणार नाही. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, तुम्ही आजारांना बळी पडू शकता, म्हणून अधिक पौष्टिक अन्न, फळे आणि भाज्यांचे सेवन करा.

हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात डॉ केतकीताई पाटील सहभागी

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२४ । अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान..सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय च्या गजर करीत गोदावरी फौंडेशन संचालिका डॉ केतकी ताई पाटील यांनी नशिराबाद येथील मिरवणुकीत सहभाग नोंदविला. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज जिल्ह्यात विविध ठिकाणी धार्मिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त डॉक्टर केतकीताई पाटील यांनी आज सकाळी यावल येथे महाजन गल्ली आयोजित श्री हनुमान आणि महादेव यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित राहून दर्शन घेतले.

तसेच सायंकाळी दिपनगर येथील जय बजरंग मित्र मंडळातर्फे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी उपस्थित राहून हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी दीप नगर परिसराची माहिती जाणून घेतली. तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी युवकांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच देशाचे योग्य नेतृत्व घडवण्यासाठी अवश्य मतदान करा असेही आवाहन केले. या प्रसंगी गजुभाऊ तायडे, स्वप्नील तायडे, किशोर सपकाळे, जयेश गाजरे यांच्यासह लहान मुले उपस्थित होते.

नशिराबाद येथील मिरवणुकीसह सजीव आरासाने वेधले लक्ष
नशिराबाद येथील बलभीम व्यायाम शाळेतर्फे आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात पालखी, मल्लखांब, आखाडा यासह सजीव आरास करण्यात आली. हे सर्व मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकीताई पाटील ह्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन श्री हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्यात. यावेळी लालचंद भास्कर पाटील, योगेश नारायण पाटील उर्फ पिंटू शेठ, किरण पाटील, सचिन भोळे, गुंजन पाटील, बंटी माळी, नीरज पाटील, पूर्वेश येवले, भावेश रोटे, नितेश पाटील, योगेश जगताप आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाचव्या दिवशी जळगावसह रावेरसाठी किती उमेदवारांनी अर्ज घेतले ; वाचा ही बातमी

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२४ । लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर पाचव्या दिवशी दि.23 एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 07 उमेदवारांनी 10 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले. तर पाचव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ललित गौरीशंकर शर्मा या अपक्ष उमेदवाराने 02 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी 01 उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ नागो साळुंखे, (अपक्ष )कोमलबाई बापूराव पाटील (अपक्ष )जितेंद्र पांडुरंग पाटील, यांनी प्रत्येकी एक तर राहुल रॉय अशोक मुळे (अपक्ष )यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. असे जळगांव व रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात एकूण 09 उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 07 उमेदवारांनी 10 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी स्वामी पांडुरंग पाटील, जळगाव( अपक्ष) 01, रोहन गणेश सोनवणे(अपक्ष ) 01, राहुल शशी कुमार सुरवाडे, जळगांव यांनी युवराज भीमराव जाधव, चाळीसगाव ( वंचित बहुजन आघाडी) यांच्यासाठी 03, नंदू शामराव पाटील (अपक्ष )01, महेश सुपडू महाजन, जळगांव ( अपक्ष)01, प्रा. प्रताप मोहन कोळी, जळगाव (अपक्ष ) 01, संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी जळगाव, (अपक्ष ) 01 असे एकूण 07 उमेदवारांनी 10 अर्ज घेतले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत. त्यात युवराज देवसिंग बारेला, चोपडा( बहुजन समाज पार्टी) 02, जालम सिंग उत्तम सिंग वतपाळ, नांदुरा( अपक्ष)02, युनूस अब्दुल तळवी यावल यांनी ममता भिकारी तळवी यावल( अपक्ष)यांचेसाठी 02, अमोल गोपाल शिरपूरकर, बोदवड ( अपक्ष)02, दीपक रतिलाल चव्हाण,पाळधी श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर(अपक्ष )04, दीपक पद्माकर भालेराव, रावेरयांनी संजय अर्जुन चौधरी,रावेर ( अपक्ष) 04, अविनाश विष्णू सोनवणे, जळगाव यांनी श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ) यांच्यासाठी 04, योगेंद्र विठ्ठल कोलते, मलकापूर(बहुजन समाज पार्टी )02, आनंद जनार्दन तेलंग, मलकापूरयांनी सौ. अनिता योगेंद्र कोलते,मलकापूर (बहुजन समाज पार्टी )02 असे एकूण 09 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी ललित गौरीशंकर शर्मा, जळगाव (अपक्ष )या उमेदवाराने 02 अर्ज तर करण बाळासाहेब पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )यांनी 01 अर्ज दाखल केला आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना करण पवार यांनी अ आणि ब फॉर्म (A B form )सादर केलेला नाही.असे मंगळवारी जळगांव लोकसभा मतदार संघांसाठी 0 3 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी. एकनाथ नागो साळुंखे , (अपक्ष )कोमलबाई बापूराव पाटील (अपक्ष )जितेंद्र पांडुरंग पाटील, यांनी प्रत्येकी एक तर राहुल रॉय अशोक मुळे (अपक्ष )यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी दिनांक 23 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 03 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 06 असे एकूण 09 अर्ज दिवसभरात दाखल झाले.

जैन भूमिपुत्र ‘रामलल्ला’ विशेषांकाचे हनुमान जयंती दिनी प्रकाशन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२४ । ‘प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान हे सेवेचे, स्वामीभक्तीचे, संस्कारशीलतचे ते प्रतिक होय. याच संस्कारातून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन परिवार सेवाभाव जोपासत आहे. प्रभू ‘रामलल्ला’ विशेषांकाचे प्रकाशन आज ग्रामदैवत श्रीराम मंदिरात झाले. या पार्श्वभूमीवर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह सहकाऱ्यांकडून आध्यात्मिक, धार्मिक आणि सेवाभाव जोपासला जावा ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना’ ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांनी व्यक्त केली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. निर्मित जैन भूमिपुत्र ‘रामलल्ला’ विशेषांक हनुमान जयंतीदिनी प्रकाशन आज श्रीराममंदीर येथे झाले. त्याप्रसंगी ह.भ.प. मंगेश महाराज बोलत होते. यावेळी कानळदा कण्वआश्रमचे स्वामी अद्वैतानंद चंद्रकिरण महाराज, ह.भ.प. श्रीराम महाराज, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, दीपक घाणेकर, अनिल राव, भालचंद्र पाटील, योगेश्वर गर्गे, स्वानंद झारे, सचिन नारळे, उदय भालेराव, ललीत चौधरी, संदीप रेदासनी, संजय रेदासनी, राजेश नाईक, महेंद्र पुरोहित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भूमिपुत्र संपादकीय मंडळाचे सदस्य अनिल जोशी, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती. अशोक जैन यांनी रामलल्ला विशेषांक निर्मितीमागची भूमिका विशद केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल जोशी यांनी केले.

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, कान्हदेशातील प्रभू रामचंद्रांच्या पाऊलखुणा, रामलल्ला प्रतिष्ठापनाप्रसंगी जळगाव शहरात लालबहादूर शास्त्री टॉवरसह विविध चौक, उद्याने येथे उत्साहाने-आनंदाने करण्यात आलेली सुंदर सजावट, अशोक जैन यांना अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मिळालेले निमंत्रण, अयोध्या यात्रेची अनुभूती, जळगावचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या राममंदिरासह कान्हदेशातील मंदिरांचा थोडक्यात इतिहास अशा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण विषयांसह रामलल्ला विशेषांक भावपुष्पांची श्रद्धाशील मांदियाळी असणारा आहे.

‘आयुष्याच्या वाटचालीत देशात-परदेशात वेगवेगळ्या निमित्ताने कितीही भ्रमंती झाली असली तरी अयोध्या येथील अनुभव हा केवळ औपचारिक प्रवासाचा अनुभव, एवढ्याच पातळीवर न राहता, आयुष्याच्या वाटचालीला भावार्थ देणारी ती एक साक्षात पवित्र अनुभूती होती! आनंदाला आध्यात्मिक आचारविचारांचे, श्रद्धाशील अंत:करणाचं कोंदण असलं तर शब्दातीत प्रचीती येते हे निश्चित! जैन परिवारातील पूर्वजांची पुण्याई आहेच, जिल्हावासियांच्या सदिच्छाही कायमस्वरूपी पाठीशी असल्यामुळेच अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनुभूती प्राप्त होऊ शकली याची विनम्र जाणीव आहे, राममंदिर साकार करणाऱ्या सर्वांविषयी, त्यांच्या परिवारातील सदस्यांविषयी नितांत आदर भावना आणि कृतज्ञता मनात ठेवत रामलल्ला विशेषांक सचित्र शब्दातीत केला आहे.’ अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी यावेळी दिली.

जैन भुमिपूत्र ‘रामलल्ला विशेषांक’ जैन इरिगेशनच्या सर्व दहा हजार सहकाऱ्यांना वितरीत करण्यात आला, यासोबत गृहपत्रिकेचा नेहमीचा अंक, प्रभू रामलल्लांची प्रतिमा आणि प्रसाद वाटप करण्यात आला.