जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । जळगाव मनपातील सत्तांतराची घटीका जशी-जशी जवळ येत आहे तसा-तसा खिरीमध्ये मूळा घालायचा प्रयत्न ठराविक मंडळींकडून होत आहे. दि. १६ मार्चची रात्र मनःस्ताप देणारी ठरली. जळगावची बदनामी होईल अशी बातमी इगतपुरी जवळच्या सुप्रसिद्ध ‘हॉटेल मानस’मधून आली. त्याचवेळी एक ज्येष्ठ नेते शिवसेनेच्या नगरसेवकांना कॉल करून ‘सुनील महाजनला महापौर करू नका’ असेही बजावत होते. याच नेत्यांनी सन २०२४ मधील विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या एकमेव समर्थकाची उमेदवारी जळगाव मतदार संघातून घोषित करून टाकली. एक गोष्ट नक्की, मतदानातून बहुमत मिळणे शक्य नसल्याचे भाजप नेत्यांनी लक्षात घेतले आहे.अशावेळी गनिमीकावा म्हणून दि. १८ ला होणारी आॕनलाईन विशेष सभा न्यायालयातून स्थगित करण्याची खेळी भाजपने केली आहे.
अगोदर चर्चा करू ती ‘हॉटेल मानस’मधील जळगाव नगरसेवकांच्या बदनामीच्या घटनेची. जळगाव मनपामधील सत्तांतरासाठी शिवसेनेने गोळा केलेले नगरसेवक ठाण्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडेकोट कस्टडीत आहेत. तेथे काहीही गडबडगुंडा होण्याची शक्यता नाही. भाजपत टीकून असलेल्या नगरसेवकांना नाशिक व इगतपुरीजवळ ठेवले आहे. यात महिला नगरसेविका ‘हॉटेल मानस’मध्ये आहेत. एका नगरसेविकेचे पती तेथे गेले. पत्नीला भेटायचा ते प्रयत्न करीत होते. त्यांना रोखण्यात आले. तेव्हा तेथे वादविवाद झाला. हा विवाद नाशिक आयजी, नाशिक एसपीपर्यंत गेला. त्यातून जळगावच्या महिलेवर बलात्कार अशी बातमी मुंबईत पोहचली. एका चैनलच्या मित्राचा मला कॉल आला. तो म्हणाला, ‘अरे असा बलात्कार झाला हे खरे आहे का ?’ हे ऐकून मस्तक भनकले. १५ दिवसांपूर्वी ‘आशादीप’ महिला वसतीगृहातील कथित कृत्यांच्या बातम्या बंद करायला मला अनेक मित्रांशी भांडावे लागले. त्यात हा कथित बलात्काराचा विषय पुन्हा जळगावशी संबंधित होता. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर भाजप गटातील या महिला नगरसेविका मुंबईत शिवसेनेकडे रवाना झाल्या.
मी पटापट जळगाव, नाशिक, इगतपुरी व ठाणे येथील मित्रांशी संपर्क केला. ‘हॉटेल मानस’मधील पती-पत्नी भेटीत अडथळ्याचा विषय समोर आला. हा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर मी त्या चैनलवाल्या मित्राला कॉल करून म्हटले, ‘चुकीचे काही प्रसारण करू नको. जळगावचे ४० नगरसेवक मुंबईतच आहेत. तुझ्या कार्यालयात पाठवतोच.’ अखेर बलात्काराचा विषय थांबला. यानंतर एक चांगली गोष्ट घडली. भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा कॉल आला. ते माझ्याशी मोकळेपणाने बोलले. जळगावमधील नियोजनात चूक झाली हे त्यांनी मान्य केले. भाजपच्या फुटीर नगरसेवकांना न्यायालयातून अपात्र ठरवूच असा निश्चय त्यांनी व्यक्त केला.
रात्री झोपेला जात असताना अत्यंत जवळच्या ५ मित्रांशी बोलणे झाले. त्यात भाजपचे माजी आणि आता राष्ट्रवादीत स्थिरावलेले ज्येष्ठनेते काय खेळी करीत आहेत ? तो विषय समोर आला. जळगाव मनपातील भाजपत पडलेली फूट ही नाराज असलेल्या सामान्य नगरसेवकांनी पाडली आहे. यात ना भाजप, ना शिवसेना व ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणाही पुढाऱ्याचा महत्त्वाचा रोल नाही. पण सत्तांतराचा अध्याय हमखास लिहिला जाईल हे लक्षात आल्यानंतर एखाद दुसऱ्याने श्रेय घेणे व लक्ष वेधणे सुरू केले. यापैकी एक धडपड ज्येष्ठ नेत्यांचीही झाली. भाजपतील आपल्या एकमेव समर्थकाला सुरूवातीला महापौर करा, नंतर उपहापौर करा आणि नंतर स्थायी समिती सभापती करा असा आग्रह या ज्येष्ठ नेत्यांचा सुरू होता. पण शिवसेनेशी त्यांचे पूर्वी असलेले सुमधूर संबंध पाहता तसे फारसे जमण्याची शक्यता नव्हती.
सत्तांतराच्या खेळात आपल्याला श्रेयाची वा हिस्सेदारीची फारशी संधी नाही हे पाहिल्यानंतर या ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेच्या ठरलेल्या नावांना सुरूंग लावायला सुरुवात केली. थेट सुनील महाजन यांना सांगितले गेले, ‘तू बायकोचा फॉर्म भरायचा नाही. माझ्या माणसाला उपमहापौर करायचे.’ हे ऐकून महाजन गडबडले. ज्येष्ठ नेते असेही म्हणाले, ‘गिरीश महाजन यांनी माझी माफी मागितली. आता आपल्याला शिवसेनेला मोठे करायचे नाही.’ हा संवाद चक्रावणारा होता. ज्येष्ठ नेत्यांनी नीतीन लढ्ढा यांनाही कॉल केला. त्यांना म्हणाले, ‘तू शिवसेनेचा व्हिप कसा काढला ? उपमहापौरसाठी कुलभूषणचे नाव का टाकले. तुम्हाला तो अधिकार कोणी दिला ?’ ज्येष्ठांची ही भाषा पाहून लढ्ढा चक्रावले. म्हणाले, ‘आपण अनुभवी आहात. शिवसेना सदस्याला व्हिप देताना ज्या उमेदवारांना मतदान करायचे आहे त्यांची नावे द्यावी लागतात. मी माझ्या पक्षाचे काम केले.’ तेव्हा संतुलन हरवलेले ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘माझे नगरसेवक जयश्रीला मतदान करणार नाही.’ तेव्हा लढ्ढा यांनी विचारले ‘तुमची माणसे म्हणजे कोण व किती आहेत ?’ त्यावर नेते म्हणाले, ‘सुनील खडके !’
याच ज्येष्ठ नेत्यांनी ललीत कोल्हे यांनाही कॉल केला. म्हणाले, ‘तुझे किती नगरसेवक आहेत ?’ कोल्हे म्हणाले, ‘१० नगरसेवक आहेत.’ ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘जोपर्यंत सुनील खडकेचे नाव निश्चित होत नाही तोवर तुझ्या लोकांचे मतदान करू नको’ आता अशा विनंतीवर कोल्हे फक्त म्हणत होते, ‘हो काका हो काका !’
या सर्व घटना-ऐकण्यात बराचवेळ गेला. तेव्हा अखेरीस एक मित्राचा कॉल आला. तो म्हणाला, ‘सन २०२४ मध्ये जळगाव विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ज्येष्ठ नेत्याने जाहीर केला.’ मी विचारले, ‘कोण रे बाबा ?’ तर नाव समोर आले, ‘सुनील खडके !’ मी ऐकून हादरलो. एखादा नेता केवळ श्रेयासाठी, आपली महती चर्चेत राहावी म्हणून इतरांना गरज नसलेले टॉर्चरिंग कसे करतो ? याचा हा दुःखद अनुभव होता…
हे सत्तांतर अनेक अनुभवांनी लक्षात राहणार हे नक्की… झाले तरी आणि नाही झाले तरी…
– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार
हे देखील वाचा :
भाजपच्या सत्ता उतार होण्याचा काळा वर्तमान