⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

अवकाळी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

0
raksha khadse panchnama news

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मका आणि केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही घरांचेही नुकसान झालेले आहे. या अवकाळी आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीची कोथळी येथील मानेगाव शिवारात भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी समक्ष पाहणी करून आढावा घेतला.

raksha khadse panchnama news1

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत संरक्षण देण्याची व्यवस्था अंमलात आणणे आवश्यक आहे. झालेलं नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानाची प्राधान्याने दाखल घेणे आवश्यक असल्याचे मत रक्षा खडसे यांनी यावेळी व्यक्त केले.

raksha khadse panchnama news2

खासदारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन मदतीचे आश्वासन दिले. यावेळी देवीदास चौधरी, शंकर चौधरी, रामदास चौधरी, पंकज चौधरी, भानुदास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उमेश राणे, अमित चौधरी, योगेश चौधरी, योगेश पाटील, मीराबाई पाटील, विजय चौधरी सर, चंद्रकांत चौधरी, श्रीकृष्ण चौधरी, अविनाश चौधरी, माधव भास्कर पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेकिंग : जळगाव शहरातील फातेमानगरात दोन गटात हाणामारी; गाेळीबार झाल्याची चर्चा

0
whatsapp image 2021 03 14 at 1.42.22 am

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव शहरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील फातेमानगरात शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कुसुंबा व फातेमानगरातील तरुणांमध्ये वाद झाला. यात दाेन गटात तुफान हाणामारी व दगडफेक झाली. यावेळी गोळीबार झाल्याची चर्चा देखील सुरु होती परंतु याला दुजोरा मिळू शकला नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,  दुचाकी अडवल्याने कुसुंबा व फातेमानगरातील तरुणांत वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या वेळी तरुणांनी एकमेकांवर दगडफेक करून दुचाकींची ताेडफाेड केली. तसेच फातेमानगरातील साई प्रसाद कंपनीतदेखील ताेडफाेड करण्यात आली. या वादामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, गाेविंदा पाटील व इतर कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी गर्दी पांगवून परिस्थती नियंत्रणात आणली. तसेच पाेलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. तर काही संशयितांचा शाेध सुरू हाेता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यावर भर द्यावा – डॉ.पाटील

0
godavari college

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । विद्यार्थ्यांनी सर्वांगिण विकास, कौशल्य, वेगवेगळ्या स्पर्धेत जास्तीत जास्त भाग घ्यावा तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर फक्त नोकरीवर अवलबूंन न राहता. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यावर भर द्यावा असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एच.पाटील यांनी केले.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बेसिक सायन्स अ‍ॅण्ड हुमॅनिटिस विभागांतर्गत ९ व १० मार्च रोजी व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तंत्र तसेच हॉलीस्टीक डेव्हलपमेंट फॉर प्रोफेशनल इंजिनियर या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात झाला. पुढे बोलतांना प्राचार्य डॉ.पाटील यांनी महाविद्यालयातील प्रत्येक विभागाचे बेसिक ज्ञान हे प्रत्येक विद्यार्थ्याला असायलाच हवे असे सांगितले.

कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनीही प्रश्न विचारून शंकाचे निरसन करुन घेतले. हा कार्यक्रम अभियांत्रिकीच्या प्रथम आणि पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला.

याप्रसंगी बेसिक सायन्स अ‍ॅण्ड ह्यमॅनिटिस विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.एन.एन.भोळे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.दिपक झांबरे हे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.सरोज भोळे, प्रा.ममता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ.एन.एन.भोळे हे उपस्थीत होते. यशस्वीतेसाठी प्रा.ललिता पाटील, प्रा.संजय चौधरी, प्रा.जुनेरिया शेख, प्रा.चेतन विसपुते, प्रा.संजय चौधरी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा.ममता पाटील यांनी केले.

संभाषणाचे महत्व, बॉडी लँग्वेजबाबत मार्गदर्शन

गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेच्या दुसर्‍या दिवशी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फॉर इंटरव्ह्यू टेक्निकवर प्रा.दिव्या पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्या लायबिलिटी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड येथे एचआर आणि बीडीएम या पदावर आहे. तसेच त्या सध्या चाईल्ड सायकॉलॉजी चा अभ्यास करत असून व्हाईट हॅटच्या रिकन्सीजर आहेत. या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी जातांना कशी तयारी करावी याबाबत मार्गदर्शन केले. आय कॉन्टेक्ट, बॉडी लँग्वेज त्यानंतर पोशाख कसा असावा ? समुह चर्चेच्यावेळी कोणत्या समस्या येतात त्यासाठी कशी तयारी करावी ? याविषयी मुद्देसुदपणे विद्यार्थ्यांना समजवून सांगितले.

संभाषणाचे महत्व, व्यक्तिमत्व विकास याचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद कार्यक्रमास लाभला. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मांडले, त्यांच्या सर्व शंकाचे निरसन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एच.पाटील यांच्यासह समन्वयक प्रा.डॉ.सरोज भोळे, प्रा.ममता पाटील हे उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा.ललीता पाटील यांनी सहकार्य केले, सूत्रसंचालन प्रा.डॉ.सरोज भोळे यांनी केले.

३ लाख अधिकचे द्या आणि नवीन बियर बार, परमीट परवाना मिळवा!

0
abhishek patil

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । राज्य उत्पादन शुल्क व दारूबंदी विभागातर्फे नवीन बियर बार व परमिटचा परवाना मिळण्यासाठी अवास्तव पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग मंत्री ना.दिलीप वळसे पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभाग आयुक्त, सह आयुक्त आणि जळगाव जिल्हाधिकारी यांना त्यांनी याबाबत निवेदन पाठविले आहे. जळगाव लाईव्ह न्यूजने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत शनिवारीच वृत्त प्रसिद्ध केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच अर्जदारांनी अधीक्षक, उत्पादन शुल्क व दारूबंदी विभाग, जळगाव या कार्यालयाकडे परमिट रूम व बिअर विक्रीचा परवाना अर्ज केला आहे. अर्जदाराने वरील परवाना देणाऱ्या कार्यालयाकडे अर्ज आहे पण अप्रत्यक्ष पैशाच्या मागणीसाठी त्यांच्याकडे गरज नसलेल्या कागदपत्रांची मागणी वरील कार्यालयाकडून केली जात आहे. त्याची पूर्तता होत नसल्यास व परवाना हवा असल्यास पैशाची मागणी या कार्यालयातर्फे केली जात आहे. कारण विचारले असते तर आम्हाला वरिष्ठ कार्यालयापर्यंतची त्यांची मागणीची पुर्तता करावी लागते अशी बिनदिक्कत व निर्धास्तपणे उत्तरे अर्जदारास मिळतात.

कार्यालयात नवीन बारचा परवाना मिळविण्यासाठी कमीतकमी ३ लाख व त्याहूनही जास्त रक्कम दिली असता काही कागद पत्रे प्रकरणात अपूर्णता असली तरी परवाना मिळतो अशी सर्वत्र चर्चा आहे. अशी अनेक उदाहरणे अर्जदारांनी तोंडी दिलीत. त्यात मला काहीच आश्चर्य वाटले नाही, कारण या खात्याची तशी कीर्ती आहेच, या खात्याचा आम जनतेशी संबंध कधीच येत नाही त्यामुळे कुठेच या कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत सर्वत्र चर्चा कधीच होत नाही त्यामुळे ठराविक लोकांशी संबंध असलेल्या या खात्याचा एकदम शिस्तबद्ध व नियोजन पद्धतीने गैरप्रकार चालतात. सर्वत्र हप्तेखोरीमुळे येथील गैरप्रकार हे सुरक्षित व संरक्षित आहेत.

समाजातील मोठ्या आर्थिक लॉबीसोबत यांचे संबंध येत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी काहीही मनमानी केली तरी खपवून घेतले जाते व त्यांचे हितसंबंध कधीच बिघडत नाही हा दृढ समज कार्यालयातील समस्त कर्मचाऱ्यांबाबत आहे व तो बऱ्याच अंशी खरा आहे. कारण मागील वर्षी लॉक डाउनच्या काळात सर्वत्र अवैध दारू विक्री बाबतीत जो धिंगाणा केला दारू दुकानदारांनी घातला होता त्याला या कार्यालयातील संमती शिवाय शक्य नव्हते. पैसे दिले की काहीच कुणाचे वाकडे होत नाही ह्याची खात्री असल्याने जिल्ह्यातील दारूच्या दुकानांवर जनतेच्या तक्रारी नंतर धाडी नुसत्या देखाव्या खातर टाकून नुसता शो केला गेला. त्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्यावरही अत्यंत साळसूदपणे नॉमिनल दंड करून दारूची दुकाने पूर्ववत सुरू केली गेली. यात मोठमोठे राजकारणी व श्रीमंत मंडळी गुंतली असल्याने त्यांच्या हित संरक्षणासाठी संपूर्ण खाते आघाडीवर असल्याचे जाणवले. यात लाखों रुपयांचा व्यवहार झाल्याने सर्व अवैध व गैरप्रकार दाबले गेले ही गोष्ट सर्व जाणकार मंडळींनी अनुभवली आहे.

खात्याच्या मंत्री महोदयांना याची भनक देखील या अधिकाऱ्यांनी लागू दिली नाही याची मला पूर्ण कल्पना आली आहे. एकंदरीत या खात्यातील भ्रष्टाचार हा संरक्षित आहे हे मात्र १००% खरे आहे. जिल्ह्यात सर्वत्र गावठी दारूचा सुळसुळाट आहे. शेकडो लोक याच्या सेवनामुळे मागील वर्षात मृत्युमुखी झाले आहेत. पण या खात्याला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. बिना परवाना कोठेही व कितीही दारू मिळते हे या खात्याला कळत नाही. मागील वर्षेपुर्वी या जळगाव ऑफिसला कुणीही कायम मुख्यअधिकारी नव्हता तरीही त्यावाचून काही अडले नाही. एकंदरीत सर्व प्रकार शिस्तबद्ध सुरू होते. एकंदरीत अश्या मानसिकता असलेला अधिकारी वर्ग डुप्लिकेट दारू बाबतीत कसा व किती स्ट्रिक्ट असेल याबद्दल शंका आहेच.

या-बाबत उच्च स्तरीय चौकशी दुसऱ्या त्रयस्थ सरकारी यंत्रणेमार्फत होणे गरजेचे आहे कारण, या यंत्रणेचा खरा टार्गेट सर्वसामान्य गरीब व व्यसनी मनुष्य आहे. आपण परवाना देणाऱ्या जिल्हा कमिटीचे चेअरमन असल्याने मी या कार्यालया संबंधित होत असलेल्या प्रकाराबद्दल काही गोष्टी आपल्या नजरेत आणून देत आहे. या कार्यालयाचे प्रमुख मा.अधीक्षक, उत्पादन शुल्क हे त्यांना भेटणाऱ्याशी सौजन्याने न वागता त्यांच्या ऑफिस कर्मचाऱ्यांना जशी वागणूक देतात तशी वागणूक व्हिजिटर्सला देतात. एकंदरीत त्यांची सरंजामी वागणूक बघावयास मिळाली. कृपया वरील बाबींवर आपण विचार कराल अशी अपेक्षा आहे व भविष्यात सहृदय होऊन हे कार्यालय पैशासाठी काहीही जीवघेणी तडजोड करणार नाही याची दखल घ्यावी अशी विनंती अभिषेक पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

विवाहितेचा छळ प्रकरणी दाखल गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरून एकास मारहाण

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील फिर्यादीच्या बहिणीस सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. तो मागे घेण्याच्या कारणावरुन भावास तीन जणांनी मारहाण केली असल्याची घटना घडली. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील योगेश कृष्णा भोई याने आज रोजी फिर्याद दिली की त्याच्या बहिणीने गावातील हेमंत एकनाथ महाजन हिच्याशी विवाह केला होता. पण त्याने व सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने तिने पारोळा न्यालायात  गुन्हा दाखल केला आहे.

या कारणावरून हेमंत एकनाथ महाजन अशोक विठ्ठल लिंगायत, मधुकर रघुनाथ महाजन,  सर्व राहणार तामसवाडी यांनी फिर्यादी योगेश यास दिनांक १५ डिसेंबर रोजी तामसवाडी बोळे रस्त्यावर रस्ता अडवून तुझ्या बहिणीने दाखल केलेली केस मागे घे नाहीतर तुला व बहिणीला जीवे ठार मारू अशी धमकी देत मारहाण केली तसेच खिश्यातील आठ हजार रूपये काढुन घेतले, म्हणून याप्रकरणी आज पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जयवंत पाटील हे करीत आहेत.

चाळीसगावकरांचे अभिनंदन ! जनता कर्फ्युला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

0
chalisagaon janta carfew

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । जिल्ह्यासह चाळीसगाव शहरात कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १३ व १४ मार्च रोजी संचारबंदीचे आदेश लागू केले आहे. चाळीसगाव नगरपालिका हद्दीत हे नियम लागू असून आज पहिल्याच दिवशी नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

चाळीसगाव कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांसाठी शहरात संचारबंदी लागू केली आहे. परिणामी आज पहिल्याच दिवशी चाळीसगावातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्वत्र सुकसुकाट दिसून आला. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी चाळीसगाव सज्ज असल्याचे चित्र आज दिसून आले.

दरम्यान नियमांचे पायमल्ली व विनामास्क धारकांना पोलिसांकडून चांगलीच चपराक दिली जात आहे. येथील सिग्नल चौक, घाट रोड, धुळे रोड, भडगाव रोड, स्टेशन रोड आदी ठिकाणी सुकसुकाट दिसून आला. वैद्यकीय सेवा वगळता शहरात सर्व बंद ठेवण्यात आले. ठिकठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तीमुळे काटेकोरपणे पालन होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी उमटविली.

अवैध दारू विक्री करणारे मालामाल तर परवाना धारक बेहाल!

0
daru crime news

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । राजू ठक्कर । कोरोना काळात अडखळत आपला व्यवसाय रुळावर आणण्याचा प्रयत्न करीत असलेल्या परवाना धारकांवर करडी नजर ठेवून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी केसेसच्या रूपाने कोरोना डोस पाजत आहेत.

टाळेबंदीच्या काळात ३ ते ४ महिने बंद असलेला व्यवसाय सुरु झाल्यावर काही दिवसांतच सरकारी आदेशांनुसार प्रत्येक नियमांचे पालन करीत उरलेल्या मालाची विक्री केली व त्या वरील कर भरला, स्वतः नुकसान सोसून कराच्या रूपाने सरकारला महसूल देऊन सुद्धा परवानाधारक हे ‘तोंड दाबून बुक्कयांचा मार’ सहन करीत आहेत. कोरोना काळात फोफावलेला अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणारे आता गब्बर झाले असून ते आजही खुलेआम अर्थातच हप्तेखोर मग ते स्थानिक किंवा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे निर्भिडपणे व्यवसाय करुन गब्बरसिंग सारखे वावरत आहेत. त्यांच्या वर राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांची मेहेर नजर का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

परवानाधारकांकडे तपासणी करताना सिंघम बनून तपासणी करतात. अवैध दारू विक्री वर धाड पडणार तर तेथे काही प्रमाणात माल सापडतो. थातूरमातूर कारवाई होते. प्रसंगी होते ही नाही, प्रकरण अत्यंत योजनाबध्द रीतीने दाबले जाते या मागील गौडबंगाल काय? अशा कारवाई नंतर अवैध विक्री करणारे निडरपणे आपला व्यवसाय करित आहेतच.

आज परत वेळेचे बंधन पाळत परवानाधारक आपला व्यवसाय करत आहेत व आपली दुकाने वेळेत बंद नाही केली तर राज्य उत्पादन शुल्क विभाग पूढे सरसावत कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहेच.
जर वेळेत दूकाने बंद झाली तर लोकांना दारू कशी व कूठे मिळते? याचे उत्तर हेच १८० रूपयांचे मद्य २५० ते ३०० रूपयात मिळणार ते ही हात गाडी लावून किंवा चौकात उभे राहून विशिष्ट पध्दतीने ग्राहकास आपल्याकडे वळणाऱ्या अवैध दारू माफीयांकडेच..

आपल्या बरोबर १० ते १२ लोकांचा उदरनिर्वाह करणारे परवानाधारक आट्यापाट्या करत पूढील वर्षीच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केसेसच्या रुपाने कोरोना डोस देण्या ऐवजी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा असा सूर सूज्ञ लोकांकडून ऐकायला मिळत आहे.

धानोऱ्यात मच्छर प्रतिबंधात्मक औषधी फवारणीची मागणी

0
dhanora chopda news

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । धानोरा प्रतिनिधी । गेल्या महिन्याभरापासून धानोरा गावात मच्छरांमुळे रोगराई वाढली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये थंडीतापसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

सद्यस्थितीत गावातील काही ग्रामस्थांना कोरोनाची लागण झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता मच्छरांमुळे पसरणारी रोगराई डोके वर करीत आहे. यामुळे या समस्येवर प्राथमिक उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने गावात मच्छर प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्याची गरज आहे.

जळगाव कोरोना अपडेट्स : आज ९८६ कोरोना पॉझिटिव्ह… सविस्तर आकडेवारी जाणून घ्या

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात रोज विक्रमी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. आज  जळगाव जिल्ह्यात एकूण ९८६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आजच ४१८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून मृताच आकडा वाढला आहे. आज ६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. आज सलग चौथ्या  दिवशी शनिवारी(ता. १३) जिल्ह्यातील रुग्णसंख्या नऊशे पार गेली. दिवसभरात ९८६ नवे रुग्ण समोर आले, त्यामुळे  जिल्ह्यात  एकुण ६९ हजार ६४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६० हजार ९३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार २७५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

आज जळगाव शहर- ३५०, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-८९, अमळनेर-०२, चोपडा-१४१, पाचोरा-४६, भडगाव-०२, धरणगाव-३४, यावल-३२, एरंडोल-७९, जामनेर-६७, रावेर-२४, पारोळा-३३, चाळीसगाव-०९, मुक्ताईनगर-१८, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातून ३ असे एकुण ९८६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.