⁠ 
शनिवार, मे 18, 2024

अमळनेर शहर कडकडीत बंद

0
janta carfew in amalner

जळगाव  लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी व अमळनेर शहर  व्यापारी महासंघाकडून दर सोमवारी जनता कर्फ्यू जाहीर केला असून सोमवारी सकाळपासून शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठ,  भाजीपाला मार्केटमधील सर्व व्यवहार बंद ठेवून जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कडकडीत बंद मुळे व्यवहार ठप्प होत असतात,याची जाण व्यापारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत सर्वाना आहे.परंतु कोरोनाची साकडी तोडण्यासाठी हे अत्यावश्यक असल्याची प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज असोसिएशन चे अध्यक्ष झामनदास सफरमल सैनानी यांनी दिली आहे.

शहरात सर्वत्र नियमांचे पालन करून व्यावसायिक व्यापारी सहकार्य करीत आहेत. बंद मधून वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने व दूध डेअरींना वगळण्यात आले आहे.

जळगाव मनपाच्या महापौर,उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाईन पद्धतीनेच होणार

0
jalgaon-manapa

जळगाव  लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी यासाठी दोन नगरसेवकांनी दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे उद्या दि.१८ मार्च रोजीची महापौर व उपमहापौरांची निवडणूक ऑनलाईन पद्धतीनेच होणार हे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी चिंचवड आणि नागपूर महापालिकेत ऑफलाईन बैठक घेवून महापौर आणि उपमहापौर निवडणूक घेण्यात आली होती. त्याच पध्दतीने जळगाव महानगरपालिकेची निवडणूक ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन या प्रकारात घेण्यात यावी अशी मागणीची याचिका डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. आज बुधवारी  न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर याचिकेची सुनावणी झाली. यावेळी मात्र खंडपीठाने महापौर व उपमहापौरांची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे म्हंटले आहे.

भाजपने फक्त ठेकेदारांची घरे भरली ; बंडखोर कुलभूषण पाटलांचा घणाघात

0
kulbhushan patil

जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीआधीच  ३० नगरसेवकांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती  भाजपचे बंडखोर नगरसेवक तथा शिवसेनेचे उपमहापौरपदाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी दिली.

दरम्यान, भाजपने जळगावकर नागरिकांना दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नसून फक्त ठेकेदारांची घरे भरली अशी, घणाघात टीका कुलभूषण पाटील यांनी केली आहे. भाजपमधील ३० सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

ते म्हणाले २०१८ साली भाजपने जळगावकरांना खूप मोठी आश्‍वासने दिली होती. मात्र प्रत्यक्षात असे झाले नाही. भाजपने फक्त ठेकेदारांची घरे भरली. यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश केला असून आपल्यासोबत ३० नगरसेवकांनी भाजपचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती देखील कुलभूषण पाटील यांनी दिली.

महत्वाची बातमी ! कोविड रुग्णांबाबत जळगावात नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर

0
new guidelines for kovid patients

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडीकेटेड कोविड हाॅस्पिटलमध्ये कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक तत्व जाहीर केले आहे.

सौम्य / अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणेबाबत तसेच अपवादात्मक परिस्थितीत घरी विलगीकरणाचा पर्याय व गृह उपचार करण्याबाबत या कार्यालयाचे संदर्भिय परिपत्रकानुसार सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये मध्ये दाखल न करता कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे.

तसेच ऑक्सिजनची आवश्यकता नसतांना देखील DCHC, DCH मध्ये या रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्यात येत असल्याची बाब जिल्हाधिकारी राउत यांच्या निदर्शनास आलेली आहे. याबाबत त्यांनी सर्व संबंधितांना सुचना निर्गमित केल्या आहेत.

काय आहेत सूचना?
1) सौम्य/अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना Covid Care Centre मध्ये दाखल करण्यात यावे
2) DCHC मध्ये केवळ ऑक्सिजनची गरज असलेले कोविड पॉझिटीव्ह / संशयीत रुग्णांवर उपचार करावा.
3) DCH दर्जाच्या रुग्णालयात अत्यवस्थ / आयसीयु रुग्णांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच 02 वर असणा-या परंतु स्थिर रुग्णांना DCHC मध्ये संदर्भित करावे.
वरील प्रमाणे सुचनांचे पालन होत आहे किंवा नाही याबाबतची जबाबदारी अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव व जिल्हा शल्य चिकीत्सक जळगांव यांना देण्यात आलीय.. तसेच याबाबत उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर  कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील झालो

0
sunil khadke

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । गेली दोन दिवसापासून मी पद मिळावे म्हणून दबाव आणत आहे  अशा बातम्या समाज माध्यमात येत आहेत.  मात्र या बातम्या कल्पोकल्पित आहेत. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही आणी नव्हती.

शहराच्या आमदारांच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि तुच्छ वागणुकीमुळे अनेक सदस्यांमध्ये असंतोष होता.  उपमहापौर म्हणून अनेक जण माझ्याकडे येऊन नाराजी व्यक्त करत होते, शहरातील जनता वैतागली आहे, अशा वेळी त्यांच्यात जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे होते. शहराचे नेतृत्व मात्र मूग गिळून गप्पा बसले होते. तेव्हा मी स्वतः जनतेत जायचे ठरविले. उपमहापौर आपल्या दारी या अभियानाच्या दरम्यान मी जनतेच्या रोषाला सामोरा  गेलो. त्या अभियानाच्या निष्कर्षांसंदर्भात आमदारांना अवगत देखील केले होते.

नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या देखील सुटत नव्हत्या त्यासाठी मी जनता दरबाराचे आयोजन केले. त्यामाध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शहराचे नेतृत्व करणारे आमदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही ते जनतेच्या समस्यांबाबत गंभीर नव्हते. नागरिक नगरसेवकांना जाब विचारात होते.  सध्या निर्माण झालेली परिस्थिती याचेच द्योतक आहे.

जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा विद्यमान विरोधी पक्षनेते श्री. सुनीलभाऊ महाजन  यांचेसह भाजपाच्या अनेक सदस्यांनी जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. पुढे काय करावे यासंदर्भात त्यांचा सल्ला घेतला.  त्या ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांनी आपली कैफियत मांडली. मी स्वतः काही सदस्यांशी बोललो. पाच सदस्य माझ्यामुळे वेगळ्या गटात सामील झाले ही वस्तुस्थिती आहे.  मात्र आम्ही भाजपाच्या सदस्यांनी पक्षांतर केलेले नाही. आम्ही आमचा वेगळा गट स्थापन करणार आहोत.

वास्तविक सत्तेच्या नवीन समीकरणात सौ. जयश्रीताईंच्या महापौर पदाबाबत सर्वांचे एकमत झालेले होते.  अशा वेळी मी उपमहापौर पदावर दावा केल्याने सामाजिक संतुलन होणे नव्हते. ही  बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे.  असे असतांना माझ्यासाठी जेष्ठ नेते खडसे यांनी दबाव आणला म्हणणे योग्य नाही.

Video : महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

0
jalgaon mayor and deputy mayor election

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

महापौर व उपमहापौरपदासाठी उद्या 18 मार्च ला निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज महापौरपदासाठी जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. याप्रसंगी दोन्ही उमेदवारांसह शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी महापौर ललीत कोल्हे, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर राखी सोनवणे, अनंत जोशी, नितीन बरडे, अमर जैन, विराज कावडिया आदींची उपस्थिती होती.

 

विषयतज्ज्ञांच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक मार्गदर्शन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक मार्गदर्शन करण्यासाठी विविध विषयतज्ज्ञांशी संवाद साधण्याचे काम डॉ. मनिषा जगताप करत आहे. आतापर्यंत दोन्ही वर्गांचे सुमारे पंधरा विषयांबाबत मार्गदर्शन सत्रे पार पडली असून उर्वरित विषयांचे मार्गदर्शन दररोज एज्युस्ट्रीम यूट्यूबच्या दहावी-बारावी परीक्षा यशोमंत्र मालिकेच्या माध्यमातून केले जात आहे.

एप्रिल व मे महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचे काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीचे अध्यापन कार्य पार पडले आहे. तसेच काही पाठ्यपुस्तकांमधील पाठ्यघटकही वगळण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशा होतील आणि त्याला सामोरे कसे जायचे याविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेला गोंधळ दूर करण्यासाठी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बहिस्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. मनीषा वसंतराव जगताप यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी परीक्षा यशोमंत्र ही मालिका सुरू केली आहे. यासाठी  सूत्रधार म्हणून रविकिरण सावळे तर तंत्रसहाय्य म्हणून पायस सावळे यांचे सहकार्य लाभत आहे. परीक्षेचे स्वरूप, गुणदान पद्धती, उत्तरे लेखनाची शैली, बोर्ड परीक्षेला अपेक्षित असलेली लेखन पद्धती, परीक्षेला सामोरे कसे जायचे आणि सर्वात महत्वाचे पालकांनी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. हे मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मनीषा जगताप राज्यभरातील विविध विषयतज्ज्ञांना एज्युस्ट्रीम यूट्यूबच्या यशोमंत्र मालिकेत आमंत्रित करत आहेत.

आतापर्यंत इयत्ता दहावी इंग्रजी – प्रमोद आठवले भुसावळ, भूगोल – वंदना तायडे जळगाव, संस्कृत – सुषमा परांजपे नाशिक, मराठी – मनीषा सावळे नाशिक, गणित – वैशाली पवार नाशिक, हिंदी मंजुषा ओस्तवाल चांदवड यांनी तर बारावी मराठी – डॉ. जगदीश पाटील भुसावळ, अकाउंटन्सी – प्रा. दिनेश राठी भुसावळ, मानसशास्त्र – डॉ. सतीश सूर्ये नंदुरबार, गणित – प्रा. वसंत पाटील नंदुरबार व  प्रा. ललिता धांडे भुसावळ, अर्थशास्त्र – प्रा. संतोष झंवर जळगाव, हिंदी – डॉ. राजेंद्र पाटील धुळे, ओसीएम – प्रा. कल्पेश चोरडिया चांदवड यांनी मार्गदर्शन केले आहे.

येत्या काही दिवसात दहावीच्या उर्दू, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र तर बारावीच्या समाजशास्त्र, इतिहास, इलेक्ट्रॉनिक्स, बायोलॉजी, हिंदी, इंग्रजी, सेक्रेटरी प्रॅक्टिस, भूगोल, विज्ञान, उर्दू, राज्यशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यासोबतच किमान कौशल्य शाखेच्या विषयांचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी डॉ. मनीषा जगताप यांनी विविध विषयतज्ज्ञांच्या माध्यमातून सुरू केलेली यशोमंत्र ही मालिका विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या मालिकेमुळे परीक्षा सुलभ होण्यासाठी मदत होणार असल्याने विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.

– डॉ. जगदीश पाटील (मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य, बालभारती पुणे)

जिल्हा नियोजन समितीवर १८ सदस्यांची नियुक्ती

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव जिल्हा नियोजन समितीवर १८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये ४ नामनिर्देशीत तर १४ विशेष निमंत्रीतांचा समावेश आहे.

नामनिर्देशित सदस्यांमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर (रा.मुक्ताईनगर), डॉ. डी. जी.पाटील (रा.धरणगाव); शिवाजीराव रावसाहेब पाटील (रा. धानवड, ता.जळगाव), राधेश्याम माधवलाल कोगटा (रा.विसनजी नगर), यांचा समावेश आहे.

तर, विशेष निमंत्रितांमध्ये माजी आमदार दिलीप ओंकार वाघ (रा. जयदुर्गानगर, पाचोरा), माजी महापौर नितीन बालमुकुंद लढ्ढा (रा. सालारनगर, जळगाव), संजय भास्करराव गरुड (रा. शेंदुर्णी, ता. जामनेर), मनोहर गिरधर पाटील (रा. निपाणे, ता.पाचोरा), साहेबराव धर्मा सोनवणे (रा. चोपडा), विजय सुदाम पाटील (रा. टिटवी, ता. पारोळा), वाल्मीक विक्रम पाटील (रा. त्र्यंबकनगर, जळगाव), मनोहर गिरधर खैरनार (रा. मुक्ताईनगर), भागवत पंडित पाटील (रा. पाडळसरे, ता. अमळनेर), डॉ. सुरेश श्यामराव पाटील (रा. चहार्डी, ता.चोपडा), शेखर सोपान पाटील (रा. सावखेडासीम, ता. यावल) आणि प्रल्हाद रामदास महाजन (रा. रावेर) या सदस्यांचा समावेश आहे.

महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईन होऊ नये यासाठी भाजप न्यायालयात

0
bjp jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक ऑनलाईन होणार आहे. याविरोधात ऑनलाइनऐवजी सभागृहात प्रत्यक्ष मतदान घ्यावे अशी मागणी औरंगाबाद खंडपीठातभाजपतर्फे करण्यात आली आहे.

न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी होणार असून काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपचे अनेक बंडखोर नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाल्याने भाजप नेत्यांची चांगलीच धावपळ सुरु आहे.

रंजना विजय सोनार आणि विश्वनाथ सुरेश खडके यांनी विभागीय आयुक्त व मनपा आयुक्तांच्या ५ मार्च २०२१ रोजीच्या ऑनलाइन निवडणुकीच्या घोषणेला आव्हान दिले आहे. पिंपरी चिंचवड आणि नागपूर मनपाच्या निवडणुका सभागृहात नुकत्याच झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव मनपाची निवडणूक ऑनलाइन घेणे चुकीचे आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.  विश्वासार्ह आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून मतदान घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.