बंगाल, आसाम, पुद्दुचेरीमध्ये भाजपचा झेंडा; जळगावात ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा जल्लोष

मे 4, 2026 3:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२६ । पश्चिम बंगाल आणि आसाम आणि पद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात आनंदाचे वातावरण आहे. याच दरम्यान, जळगाव येथील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

bjpjl

देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज सकाळी ८ वाजेपासून जाहीर केला जात आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहून १५ वर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाले असून भाजपने मोठ्या विजयाकडे वाटचाल केली आहे. भाजप तब्बल १९५ जागांवर आघाडीवर आहे, तर दुसरीकडे आसाममध्येही भाजपचा एकतर्फी विजय निश्चित झाला असून ९८ जागांवर आघाडी घेतली आहे. पद्दुचेरीमध्येही कमळ फुललेय.

दरम्यान, या तीन राज्यांमध्ये भाजपने स्पष्ट आघाडी घेतल्याचे आणि विजय निश्चित झाल्याचे समजताच जळगाव मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. शहरातील भाजप कार्यालयाबाहेर स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ आणि ‘नरेंद्र मोदी झिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच ढोल-ताशांच्या गजर करत आणि फटाक्यांची मोठी आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आणि गुलालाची उधळण करत हा ऐतिहासिक विजय साजरा केला.

यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या हुकूमशाही राजवटीला तेथील जनतेने नाकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये जनतेने भाजपच्या विकासाला साथ दिली असून, बंगालमधील हा विजय ऐतिहासिक आहे.”

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now