⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

महासभेत भाजपने घेतली माघार : उपमहापौरांनी मागितली नाही माफी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२२ । महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रभु श्रीरामांपेक्षा रावण श्रेष्ठ असे वक्तव्य करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपच्या सदस्यांनी बुधवारी झालेल्या महासभेत गोंधळ घातला होता. तसेच गुरूवारी मनपासमोर आंदोलन करून उपमहापौरांच्या प्रतिमेला काळे देखील फासले होते. हाच वाद शुक्रवारी झालेल्या महासभेत देखील पाहण्यास मिळाला आणि सभा तहकुब देखील झाली होती. पून्हा सभा सुरू होवून अखेर भाजपने माघार घेत महासभेत उपमहापौरांच्या निषेधाचा ठराव करून या वादावर अखेर पडला.

जळगाव महापालिकेची बुधवारी झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक मयुर कापसे यांनी मक्तेदार, ठेक्यांच्या टक्केवारी यावर उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर वाद निमार्र्ण झाला होता. त्यात प्रभू श्रीराम यांच्या विषयी अपमानास्पद शब्द उपमहापौरांनी केल्याचा भाजपने आरोप करत उपमहापौरांनी माफी मागावी असा आक्रमक पवित्रा घेतला होता. याबाबत गुरुवारी मनपासमोर भाजप व उद्धव ठाकरे गट शिवसेना यांचे आमने सामने आंदोलन झाले होते. त्यामुळे शुक्रवारी होणारी तहकूूब महासभेची सुरवात गोंधळाने होणार असे बोलले जात होते. त्यानुसार आज महासभेला सुरवात झाली भाजपचे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी काळेकपडे घालून उपमहापौर यांचा निषेध केला. तसेच यावेळी उपमहापौरांनी केलेल्या वक्तव्याची माफी मागावी अशी भाजप नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेवून गोंधळ घातला. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी दहा मिनीटासाठी सभा तहकुब केली.

भाजपाने उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमीका घेतल्याने महासभा तहकुब करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक महापौर, उपमहापौर यांची बंद दालनात ४० मिनीट बैठक होवून त्यात खलबते झाले. यात शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी शहराच्या विकास कामांचे प्रस्तावर निर्णय होणार असून गंोंधळ घालून महासभेचे कामकाज थांबवू नये, ६ महिन्यातच निवडणूका लागणार असून सगळ्यांना नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. मनपा समोर आंदोलन करून तुम्ही निषेध केले आहे. हा विषय संपवा अशी मागणी केली.

यावर शिवसेना नगरसेवक व भाजप नगरसेवक यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. यावेळी शिवसेनेच्या सदस्यांनी शहरातील विकास कामांबाबत मुद्दाम गोंधळ निर्माण केला जात आहे असे भाजपावार हल्लाबोल केला. तसेच हा विषय संपविण्याची मागणी केली. भाजपच्या सदस्यांनी नरमती भूमिका घेत उपमहापौरांचा निषेधाचा ठराव केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमचा विरोध नाही असे स्पष्टीकरण भाजपचे सदस्य जितेंद्र मराठे यांनी केले.