⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावातील शिवसेना नगरसेवकाने उधळली भाजप आमदारावर स्तुतीसुमने, जाणून घ्या कोण काय म्हणाले..

जळगावातील शिवसेना नगरसेवकाने उधळली भाजप आमदारावर स्तुतीसुमने, जाणून घ्या कोण काय म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । राज्यात भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी आणि शिवसेना आहेच परंतु जळगाव मनपात देखील काही वेगळे चित्र नाही. जळगाव मनपात तर राज्यापेक्षा टोकाची दुश्मनी भाजप आणि सेनेत आहे. शिवसेनेने भाजपकडे असलेली सत्ता हिसकावून आपल्याकडे खेचून आणली आहे. भाजपच्या आमदारांवर शिवसेनेकडून आजवर नेहमीच टीका करण्यात आली आहे. शिवसेना विरुद्ध आमदार सुरेश भोळे असेच चित्र आजवर पाहायला मिळाले आहे. असे असले तरी शिवसेनेच्या एका नगरसेवकाने मात्र सोशल मीडियाच्या एका पोस्टवर आ.भोळेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत. आमदारांवर कौतुकाचा वर्षाव करण्यामागील कारण म्हणजे आ.भोळे यांनी शिवसेनेच्या त्या नगरसेवकाच्या प्रभागातील विविध विकासकामांसाठी निधी दिलेला आहे.

जळगाव शहर मनपात गेल्या अनेक वर्षांपासून असलेली सुरेशदादा जैन यांच्या सत्तेला सुरुंग लावत भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता प्रस्थापित केली होती. भाजप नेते आ.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हा चमत्कार घडवून आणला होता. वर्षभरात जळगाव शहराचा कायापालट केला नाही तर आ.सुरेश भोळे यांच्यासाठी मत मागायला देखील येणार नाही असेही ते म्हणाले होते. भाजप काळात जळगावचा हवा तसा विकास झाला नाही तोच मुद्दा हेरत शिवसेनेने खेळी खेळली आणि भाजपचे नगरसेवक फोडले. आ.सुरेश भोळे निधी देत नसल्याचा आरोप करीत भाजप नगरसेवक बाहेर पडले आणि शिवसेनेच्या तंबूत शिरले. मूळ कारण वेगळे असले तरी टीकेचे धनी मात्र आ.भोळे झाले. मनपावर भगवा फडकल्यापासून शिवसेना विरोधात भाजप अशी दुश्मनी आणखीनच वाढली.

हे देखील वाचा : Vidhan Parishad : विधान परिषद निवडणुकीत जळगावच्या तीन आमदारांची चर्चा राज्यभर का होतेय?

जळगाव मनपात आणि राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र आहे. जळगावात तर शिवसेनेकडून वारंवार आ.सुरेश भोळे यांच्यावर टीका केली जाते. आ.भोळे बहुदा प्रत्युत्तर देत नसले तरी पाठपुराव्यासाठी ते देत असलेल्या पत्रावरून देखील राजकारण होते. जळगाव लाईव्ह टीम दरमहा करीत असलेल्या आमदारांच्या गुण तालिकेत जळगावकरांनी आ.भोळे यांच्याविषयी संमिश्र प्रतिसाद नोंदविला आहे. दरम्यान, जळगाव मनपाचे शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मात्र आ.सुरेश भोळे यांच्यावर सोशल मीडियात जळगाव लाईव्हच्या फेसबुक पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कधी आ.भोळेंसोबत असलेले विरोधात प्रतिक्रिया देत असले तरी शिवसेना नगरसेवकाने दिलेल्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा आहे.

शिवसेना नगरसेवकाने केलेल्या सकारात्मक कमेंटमागे कारण देखील तसेच आहे. आ.भोळे यांनी संबंधित शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रभागातील विविध विकास कामासाठी आपल्या आमदार निधीतून निधी दिला आहे. प्रशांत नाईक यांनी कमेंटमध्ये या सर्व कामांचा उल्लेख करीत जळगाव शहराचे एक नंबर असे देखील म्हटले आहे. जळगाव लाईव्ह टीमकडून दरमहिन्याला एका आमदाराचे पोस्टर फेसबुकला पोस्ट करीत गेल्या दोन वर्षात त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना किती गुण देणार अशी विचारणा करीत जळगावकरांचे मत घेतले जाते. जळगावकरांकडून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटत असतात. सर्व आमदारांचे प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड संपल्यावर दोन्ही खासदारांबद्दल विचारणा करणारे पोस्टर अपलोड केले जाणार आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.