⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मोठी बातमी : जिल्ह्यातील आणखी एका गुन्हेगारावर ‘एमपीडीए’

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२३ । जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांवर चांगलाच फास आवळला असून धडक कारवाया सुरू आहेत. जिल्ह्यातील चाळीसगाव येथील निखील उर्फ भोला सुनील अजबे या गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. चाळीसगाव पोलीस ठाणे आणि जळगाव एलसीबीने याबाबत पाठपुरावा केला होता. ( mpda jalgaon)

जिल्ह्यात जळगाव पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी आणि पथकाचे धडाकेबाज काम सुरू आहे. गेल्याच आठवड्यात चाळीसगाव येथील ११ गुन्हेगारांवर तर जळगाव शहरातील ५ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या पाठोपाठ आता चाळीसगाव शहरातील नारायणवाडी भागातील रहिवासी निखील उर्फ भोला सुनील अजबे ( वय २१) या तरूणावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने निवेदन जारी केले आहे.

निखील उर्फ भोला सुनिल अजबे वय-२१ वर्षे रा.नारायणवाडी, चाळीसगांव याच्या विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीस जुलै -२०२२ मध्ये दोन वर्षाकरिता जळगांव जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आलेले होते. हद्दपार कालवधी मध्ये देखील सदर आरोपीने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन चाळीसगांव शहरात विविध गुन्हे केलेले होते.

या अनुषंगाने आगामी काळात होणार्‍या निवडणुका व विविध जाती-धर्माचे सण-उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी या आरोपींविरुध्द कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जळगांव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. या आदेशान्वये व अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे आणि सहा.पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक के. के. पाटील आणि सहकारी पोलीस नाईक विनोद भोई, तुकाराम चव्हाण अशांनी वर नमुद इसमाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विना परवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ सुधारणा अधिनियम १९९६, २००९ व २०१५ चे कलम ३ (१) नुसार स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील व त्यांचे सहकारी हवालदार सुनील दामोदरे यांनी तात्काळ पुढील कारवाई करुन प्रस्ताव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना पाठवला होता. दि. ३० रोजी जिल्हादंडाधिकारी यांनी भोला यास स्थानबध्द करण्याबाबतचा आदेश काढला आहे. आरोपीला आज सपोनि सागर ढिकले, पोलीस नाईक अमित बाविस्कर, हवालदार अमोल भोसले, रविंद्र वच्छे यांच्या पथकाने अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द केले आहे.