राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय

सप्टेंबर 1, 2026 4:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२६ । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण ४ मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कारवाईचा प्रभाव आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळाला. शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

mantralay fadanvis

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

नशामुक्त महाराष्ट्र अभियान:

सन २०२९ पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचे मूळ नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने ‘Whole-of-Government Approach’ धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून अंमली पदार्थांविरोधात व्यापक आणि कठोर उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.

शासकीय कार्यक्रमांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ बंधनकारक:

राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय बैठका, विविध कार्यक्रम तसेच शासकीय उपहारगृहांमध्ये (कँटिन) आता आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे अशा ठिकाणी संतुलित मेन्यू ठेवणे अनिवार्य असणार असून, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.

सोलापूर उन्नत मार्गाला मंजुरी:

सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानच्या उन्नत मार्ग प्रकल्पाला ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामुळे आवश्यक असलेली शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी ५,७०४ कोटींचा निधी:

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी ५,७०४.५० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे तब्बल १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून, पुणे जिल्ह्यासह परिसरातील सिंचन व्यवस्थेला याचा मोठा फायदा होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now