⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

भोसरी प्रकरणी मंदाकिनी खडसेंना दिलासा, न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मंदाकिनी खडसे यांनी आता ईडी कार्यलयात जायची गरज नाही नसून त्यांना हजेरीपासून मुभा देण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे.

पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. मंदाकिनी खडसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे.  त्यापूर्वी सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी दोन महिने सतत हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंदाकिनी खडसे यांना दर आठवड्यात मंगळवारी आणि शुक्रवारी चौकशीला हजर राहयचे होते.

दरम्यान, आज झालेल्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीत मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी मंदाकिनी खडसे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य केल्याचे सांगितले. त्यांतर उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याबाबतचे आदेश रद्द केले आहेत. आता याबाबतची पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे त्यावेळी ईडीच्या वतीने केंद्राचे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर कोर्ट मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करणार आहे.