⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

भोंगे : राज ठाकरेंनी केले योगी सरकारचे अभिनंदन, पहा ते ट्विट..

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्याभरापासून मशिदीवरील भोंगे हटविण्याचा मुद्दा लावून धरला आहे. राज ठाकरे हे लवकरच औरंगाबाद येथे सभा देखील घेणार असून त्यांनी सरकारला ३ मी पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. गुरुवारी राज ठाकरे यांनी ट्विट करीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. तसेच अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावत ‘आमच्याकडे योगी नसून सर्व भोगी असल्याची टीका त्यांनी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या एका मुद्द्यावरून प्रचंड चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळावरील विशेषतः मशिदीवरील भोंगे हटविण्याचा मुद्दा लावून धरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची आठवण करून देत त्यांनी सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला असून तुम्ही भोंगे उतरावा अन्यथा आम्ही हनुमान चालीसा वाजवू असे त्यांनी सांगितले आहे. राज ठाकरे त्या मुद्द्याचा वारंवार पुनरूच्चार करीत असून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहे. पुढील आठवड्यात औरंगाबाद येथे सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

राज ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी एक ट्विट केले असून त्यात उत्तरप्रदेशच्या योगी सरकारचे अभिनंदन केले आहे. उत्तरप्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषतः मशिदीवरील भोंगे उतरविल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन व आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही. आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. अजान आणि लाऊडस्पीकर असे हॅशटॅग वापरत त्यांनी ते ट्विट केले आहे.