⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

बँक एटीएम कार्ड बदलून शेतकऱ्याची ३६ हजारांची फसवणूक; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । मंजूर झालेले पीक कर्ज काढण्यासाठी स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गेेलेल्या शेतकऱ्याला ३५ ते ४० वर्षीय भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून ३६ हजार रूपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात समाेर आला आहे. या प्रकरणी अज्ञात भामट्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

पिंप्री गणेशपूर येथील सतीश दगडू चव्हाण यांच्या आईच्या नावावर शेती असल्याने त्यांच्या नावे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गणेशपूर शाखेत खाते उघडले आहे. या खात्याचा बँकिंग व्यवहार सतीश चव्हाण हेच पाहतात. या खात्यात नुकतेच ४६ हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर झाल्याने पैसे जमा झाले हाेते. चव्हाण हे बँकेच्या एटीएम कार्डद्वारे या खात्यातून पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या एटीएममध्ये गेले. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पैसे काढता येत नव्हते. गर्दीत चव्हाणांच्या मागे उभा असलेल्या अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाचा टी शर्ट व जीन्स पँट घातलेला एक इसम येऊन मी पैसे काढून देतो असे त्याने सांगितले. चव्हाण यांनी त्याच्याजवळ एटीएम कार्ड दिले असता त्याने ते मशिनमध्ये टाकून चव्हाणांना एटीएम पिन टाकण्यास सांगितले. परंतु तरीही एटीएममधून पैसे निघाले नाहीत. तेव्हा इसमाने चव्हाणांना दुसरेच एटीएम कार्ड दिले. ते घेऊन ते घरी आले.

२०रोजी सतीश चव्हाण हे एचडीएफसी बँकेच्या येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता सदर कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी २३ रोजी जेडीसीसी बँकेच्या गणेशपूर शाखेत जावून कार्डची चौकशी केली असता त्यांच्याजवळील एटीएम कार्ड हे दुसऱ्याच महिलेचे असल्याचे समजले.