⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

अभयारण्यातील वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांकडे आणखी एक अतिरीक्त चार्ज…

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । नुकताच अभयारण्याचा दर्जा प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्यात वनपरीक्षेत्र अधिकारी यांचेकडे शेजारील मुक्ताईनगर वनक्षेत्राची जबाबदारी येऊन ठेपल्याने त्यांना दोंन्ही रेंजचा कारभार बघावा लागत असुन मुक्ताई भवानी अभयारण्यात असलेल्या तिंन्ही वनपरीमंडळाच्या कारभाराचा धुरा एकमेव वनपाल सांभाळत असल्याने स्थानिकांसह वन्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सदर अभयारण्यात डोलारखेडा,चारठाणा व कुऱ्हा अशा तिन वनपरीमंडळा समावेश आहे. या ठिकाणी तीन वनपालांची आवश्यकता असताना एकमेव एकच वनपालांकडे हा संपुर्ण कार्यभार असल्याने वनसंवर्धनास अडचणी, समस्या निर्माण होतील यात शंका नाही. काही दिवसांपूर्वी डोलारखेडा वनपाल पी.टी.पाटील यांची बदली होऊन त्यांनी पाल वन्यजीव येथे पदभार स्वीकारला. तसेच कुऱ्हा वनपाल मराठे ह्या ट्रेनिंगसाठी गेल्यामुळे या दोन्ही वनपरीमंडळाचा अतिरीक्त कार्यभार चारठाणा वनपरीमंडळातील वनपाल पाचपांडे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने चारठाण्यासह इतर दोंन्ही ठिकाणचा तथा अभायरण्यातील संपुर्ण वनपरीमंडळाचा धुरा एकमेव वनपाल पाचपांडे यांच्यावर सोपविण्यात आल्याने संपुर्ण जबाबदारी सांभाळत असतांना एकाच अधिकाऱ्याची दमछाक होत आहे. दरम्यान गत नऊ महिन्यांपासून सदर वनक्षेत्राला वनक्षेत्रपाल हा आतिमहत्वपुर्ण पदभार रिक्त राहीला. काही दिवसांपूर्वी गोंदिया येथुन वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांची येथे नियुक्ती केली खरी मात्र मुक्ताईनगर वनक्षेत्रातील वनक्षेत्रपाल बच्छाव यांची बदली झाल्याने या दोंन्ही वनक्षेत्राच्या जबाबदाऱ्या ठाकरे यांच्यावर आहे. २५-३० मे दरम्यान डोलारखेडा वनपाल पी.टी.पाटील यांची येथुन बदली होऊन वन्यजीव पाल येथे करण्यात आली. व्याघ्र अधिवासास अतिसंवेदनशील क्षेत्र असलेल्या डोलारखेड्यात नवीन अधिकारी यांची कोणतीही तजवीज नसताना वनविभागाने कार्यक्षम अधिकारी यांची बदली करणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

सदर क्षेत्रात असलेल्या पट्टेदार व्याघ्र अधिवासामुळे नुकताच ३१ मे रोजी मुक्ताई भवानी राखीव वनसंवर्धन क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला, यामुळे या वनक्षेत्रास महत्व प्राप्त झाले आहे. लोकसहभागासह जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि वनविभागाकडुन संबंधित क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. सदर क्षेत्रातील अतिक्रमण तसेच पिंप्रिपंचम येथील गौणखनिज उत्खनन याबाबतीत असलेल्या वनगुन्ह्यांचे तपासकार्य अपुर्णावस्थेत असल्याने या गंभीर गुन्ह्यांबाबत वनप्रशासनाकडुन दिरंगाई होत असल्याचाही आरोप होत आहे. वनविभागाने या अतिसंवेदनशील भागात तातडीने रिक्त पदभाराची पुर्तता करावी.अशी मागणी वजा अपेक्षा वन्यजीवप्रेमी तसेच स्थानिकांकडुन होत आहे.

संपुर्ण वनपरीमंडळांचा कारभार एकाच वनपालाकडे असल्याने वनसंवर्धानास अडथळे येत असल्याचे चित्र आहे. व्याघ्र अधिवास क्षेत्र डोलारखेडा येथे कायमस्वरुपी वनपालाची नेमणुक वनविभागाने तातडीने करावी. -विनोद थाटे,वनसमिती अध्यक्ष डोलारखेडा