जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२४ । सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. याच दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ज्येष्ठांसाठी एक नव्या योजनेची घोषणा केली आहे. ती म्हणजे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले.
यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.
आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु करत असताना नियमावली ठरवू, खर्च आणि इतर बाबी पाहू. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवू.. जे लोक इच्छा असून दर्शनापासून वंचित राहतात त्यांना देवदर्शन घडेल त्यासाठी हा निर्णय घेत आहे. ही योजना सर्व धर्मीयांसाठी असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं