चाळीसगावकरांसाठी खुशखबर! अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेसला चाळीसगाव स्थानकावर थांबा मंजूर

सप्टेंबर 21, 2025 1:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२५ । दिवाळी आणि छठ पुजेचे निमित्त भुसावळ आणि जळगावमार्गे मध्य रेल्वेनं अनेक विशेष गाड्याची घोषणा केली आहे. यामध्ये अमरावती-पुणे दरम्यान एक विशेष गाडी धावणार असून या गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा मंजूर आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

train

उद्या म्हणजेच २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवला सुरुवात होणार आहे. यानंतर दिवाळी आणि छठ साजरा होणार असून या सणानिमित्त अनेक जण परिवारासह गावी जातात. यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने शेकडो गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून यात जळगाव-भुसावळमार्गे अमरावती-पुणे दरम्यान एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

वेळापत्रक..

०१४०३ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाडी ७ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी चाळीसगावला पहाटे ४ वाजून ०३ मिनिटाने, तर जळगावला सकाळी ५ वाजून २८ मिनिटाने व भुसावळ रेल्वे स्थानकावर सकाळी ५ वाजून ५५ मिनिटाने पोहोचेल. यानंतर अमरावती येथे त्याच दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होतील. याशिवाय, ०१४०४ साप्ताहिक विशेष गाडी आठ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी अमरावती येथून १२.०० वाजता सुटेल आणि भुसावळ दुपारी ३ वाजून ४० मिनिटाने पोहोचेल. तर जळगावला दुपारी ४ वाजून ०८ मिनिटाने व चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सायंकाळी ५ वाजून १३ मिनिटाने पोहोचेल. यानंतर पुणे येथे दुसऱ्या दिवशी ००.१५ वाजता पोहोचेल.

या गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकावर थांबा असून ही गाडी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी जास्त सोयीची ठरणार आहे. दरम्यान, पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी विशेष गाडीला दोन्ही बाजुने चाळीसगाव येथे थांबा देण्यात यावा म्हणून जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी पाठपुरावा केला होता. अखेर या अमरावती-पुणे- अमरावती गाडीला चाळीसगावला थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरदारांना नोकरीसाठी तसेच व्यावसायिक व व्यापाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी ही गाडी सोयीची ठरेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now