जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव-मालेगाव मार्गावरील बिलाखेड गावाजवळ भरधाव कारने महिलांना दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, तर तिघी गंभीर जखमी झाल्याच्या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी कारचालक आणि भाजपचे सरचिटणीस जितेंद्र रविंद्र पाटील यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दोन वेळा रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिलाखेड येथील हनुमान मंदिराजवळ हा अपघात झाला. काही महिला रस्ता ओलांडत असताना चाळीसगावहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सुशीलाबाई गुलचंद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर संगीता पोपट कोळी, सुनीता संजय वंजारी आणि विठाबाई युवराज हाडपे या तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. तसेच कारचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र सुरुवातीला केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्याने या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा होती. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर मृत महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरून जितेंद्र पाटील यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहे.





