जळगाव पुन्हा हादरले ! क्षुल्लक वादातून प्रौढाचा गळा दाबून खून

जानेवारी 11, 2026 11:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भाऊसाहेब पवार (वय ५८) यांचा जळगावच्या अजिंठा चौफुलीजवळील एका हॉटेलजवळ मृत आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासांतच थरारक उलगडा केला. हा निर्घृण खून असल्याचे निष्पन्न झाले आहे.

crime 2 jpg webp

क्षुल्लक वादातून एका हॉटेल वेटरला लाथाबुक्क्यांनी तुडवून आणि गळा दाबून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला बेड्या ठोकल्या आहेत. हुसेन शेख आयुब शेख (३०, रा. ट्रान्सपोर्टनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून या घटनेने खळबळ उडाली आहे. अटक केली आहे.

भाऊसाहेब पवार हे सात वर्षापासून का.उ. कोल्हे शाळेजवळील एका हॉटेलमध्ये काम करीत होते. शुक्रवारी ते अजिंठा चौफुलीजवळील एका हॉटेल जवळ बेवारसरित्या सापडले होते. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मयत घोषित केले होते. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

भाऊसाहेब पवार यांची त्यांच्या शालकाने ओळख पटविली. त्यांच्या गळ्याजवळ ओरबाडल्यामुळे जखमा दिसल्याने घातपाताचा संशय आला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अक्रम शेख, मुरलीधर धनगर, किशोर पाटील व राहुल कोळी यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने सीसीटीव्ही तपासले असता हुसेन शेख आयुब शेख हा पवार यांचा गळा आवळून त्यांच्या अंगावर उडी मारताना दिसला. पोलिसांनी त्याला ट्रान्सपोर्ट नगरातून ताब्यात घेतले.आरोपीवर बीएनएस २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि गणेश वाघ करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now