विना मीटर प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई

नोव्हेंबर 17, 2021 6:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । जळगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला जळगाव शहरातील ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक परवानाधारक ऑटोरिक्षाला मोटार वाहन नियम ११९ व १३७ अन्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे ते सुस्थितीत असणे देखील बंधनकारक आहे. कुठल्याही परिस्थितीत परवाना अटींचे उल्लंघन करता येत नाही. अन्यथा ऑटोरिक्षा परवाना धारकावर मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकरी श्याम लोही यांनी दिला आहे.

Autoriksha 2 jpg webp

एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य असून ही बाब कायदेशीर आहे. १ नोव्हेंबर रोजी झालेल्या लोकशाही दिनी जळगाव शहरातील ऑटोरिक्षा परवाना धारक हे त्यांच्या ऑटोरिक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर न बसविता अवाच्या सव्वा भाडे आकारणी करीत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे. जळगाव शहरातील सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी लवकरात लवकर आपल्या रिक्षांना फेअर मीटरप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटरप्रमाणे भाडे आकारणी करावी. असे न झाल्यास संबंधित ऑटोरिक्षा परवाना धारकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

तपासणी मोहिमेत ९८ जणांना दंड

विना फेअर मिटर तसेच ना-दुरुस्त फेअर मिटर असतांना प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाधारकांविरुध्द जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकाव्दारे तपासणी मोहिम ९ नोव्हेबरपासून सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत आतापर्यंत एकूण ९८ विना फेअर मिटर, ना-दुरुस्त फेअर मिटर असलेल्या ऑटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचेकडून ६७ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहिम अविरतपणे सुरु ठेवण्यात येणार आहे.

अशी करता येईल तक्रार 

जळगाव शहरात ऑटोरिक्षा परवानाधारक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील तर अशा ऑटोरिक्षा चालकाविरुध्द उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ०२५७-२२६१८१९ या क्रमांकावर किंवा [email protected] या संकेतस्थळावर नागरिकांनी तक्रार करावी. तक्रार प्राप्त ऑटोरिक्षा परवानाधारकावर कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकरी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now