⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

दुर्दैवी : डॉक्टर मित्रांवर काळाचा घाला, बसच्या धडकेत दोघे ठार

Amalner News । जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेरहून शिरपूरकडे जाण्यासाठी निघालेल्या बुलेटला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन डॉक्टर मित्रांना जागीच प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना अमळनेर बेटावद रस्त्यावरील हॉटेल माधवीजवळ शुक्रवारी दुपारी घडली.

अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील डॉ.महेंद्र शांतीलाल बोरसे (वय-३९) व त्यांचा मित्र डॉ. अरूण नथ्थू साळुंखे (वय-३८) रा. हिंगोण खुर्द ता.अमळनेर हे दोन्ही शुक्रवार दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुलेट क्रमांक एमएच.१८.एव्ही.३११ ने अमळनेर-बेटावद रस्त्याने शिरपूरकडे जात होते. ब्राम्हणे फाट्याजवळील हॉटेल माधवी जवळ समोरून येणारी शिरपूर-अमळनेर बस क्रमांक एमएच.२०.बीएल.३९८१ ने बुलेटला जोरदार धडक दिली.

भीषण अपघातात दुचाकीस्वार डॉ.महेंद्र बोरसे आणि डॉ.अरूण साळुंखे हे जागीच ठार झाले. बस दुसऱ्या बसला ओव्हरटेक करत असतांना हा भीषण अपघात झाल्याचे समजते. दोघांचे मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. याप्रकरणी रविंद्र मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किशोर पाटील करीत आहे.

पाडसे येथील डॉ.महेंद्र बोरसे हे परिसरात मनमिळाऊ असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ तर अरुण साळुंके यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.