⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | जय श्रीराम : अयोध्येच्या धर्तीवर पाचोर्‍यात साकारणार राम मंदिर

जय श्रीराम : अयोध्येच्या धर्तीवर पाचोर्‍यात साकारणार राम मंदिर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १२ एप्रिल २०२३ | अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. वर्ष अखेरिस हे मंदिर सर्वांसाठी खुले होणार आहे. सर्वांना अयोध्येत जावून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणे शक्य नसले तरी आता अयोध्येच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यात साकारण्यात येत असलेल्या प्राचीन मंदिरात दर्शन घेता येणार आहे. पाचोरा येथील हिवरा नदीकाठी असलेल्या प्राचीन व जागृत देवस्थान असलेल्या राम मंदिर परिसराला आता पर्यटन स्थळ विकास योजनेंतर्गत अयोध्येच्या धर्तीवर नवे रूप प्राप्त होणार आहे. यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

पाचोरा शहरात हिवरा नदीकाठी राम मंदिराचा भव्य परिसर आहे. या परिसरात राम मंदिरासह हनुमान मंदिर, महादेव मंदिर, गोशाळा, व्यायाम शाळा असा भव्य परिसर आहे. संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांसाठी हे मंदिर मोठे श्रध्दास्थान आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री होण्याअगोदर एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येऊन पुरोहित गजानन जोशी यांच्या मंत्रोच्चारात काही विधी व ग्रहशांतीही केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी भविष्यवाणी याच मंदिरात झाली होती, अशी चर्चा आहे.

या मंदिर परिसराचा विकास व्हावा, यासाठी आमदार किशोर पाटील यांनी शासन दरबारी प्रस्ताव सादर करून निधीसाठी पाठपुरावा चालवला होता. त्या आधारे पर्यटन विकास योजनेंतर्गत राम मंदिर परिसर विकासासाठी पहिल्या टप्प्यात दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या जून महिन्यापासून प्रत्यक्ष कामास सुरवात होणार आहे.

असे असेल मंदिर व परिसराचे नवे रुप

अयोध्या येथील राम मंदिराच्या धर्तीवर येथे भव्य दिव्य मंदिर साकारणार असून, मंदिराच्या चारही बाजूला पाणी व विविध विधिसाठी घाट, नदीवर पूल, मंदिर परिसरात प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग, पूजा विधीची जागा, गोशाळा, बगीचा, बालकांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी आरामदायी बसण्याची व्यवस्था, खुली जिम, व्यायाम शाळा, प्रशस्त पार्किंग, लॉन व खुले सभागृह, हॉटेल, सर्व परिसरात फिरता येईल, असे प्रशस्त रस्ते अशा सर्व सुविधा साकारल्या जाणार आहेत.

या परिसर विकासासाठीचा आराखडा वास्तु विशारद सुजित वर्मा यांनी तयार केला आहे. आमदार किशोर पाटील, सुजित वर्मा, सर्वाजनिक बांधकाम विभागाचे अभियंता डी. एम. पाटील, एमएसपी ‘बिल्डकॉन’चे मनोज पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. येत्या जून महिन्यात कामास प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.