⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | गुन्हे | गंभीर : खोटे नाव सांगत केली ओळख, नंतर ब्लॅकमेल करून अत्याचार

गंभीर : खोटे नाव सांगत केली ओळख, नंतर ब्लॅकमेल करून अत्याचार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १४ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका तरुणाने खोटे नाव सांगून त्याने एका विद्यार्थिनीसोबत मैत्री केली नंतर तिच्यासोबत काही फोटो काढले. भेटायला न आल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. गुन्ह्यात तरुणाला आणखी एकाने सहकार्य केले असून वर्षभर सुरू असलेला प्रकार असह्य झाल्याने याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शब्बीर मन्यार आणि इकबाल शेख अशी गुन्हा दाखल असलेल्या संशयितांची नावे आहेत.

जळगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एक २० वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. एप्रिल २०२२ मध्ये महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बसलेले असताना विद्यार्थिनीची एका विद्यार्थ्याशी ओळख झाली. तरुणाने स्वतःचे नाव जॅक उर्फ सागर सोनवणे रा.साक्री, ता.धुळे असे सांगितले. सिनियर असल्याने दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले. काही दिवसांनी दोघे इंस्टाग्रामला भेटले असता तरुणाचे नाव इमू मन्यार असल्याचे तिला दिसले. तरुणीने याबाबत विचारणा केली असता मुस्लीम मुलांशी मुली बोलत नाही, म्हणून नाव खोटे सांगितले असे तो म्हणाला. तसेच स्वतःचे नाव इम्रान शब्बीर मन्यार असल्याचे त्याने सांगितले.

महाविद्यालय प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक कामानिमित्त दोघे भेटत असताना त्याने विद्यार्थिनीसोबत सेल्फी काढले. जून – जुलै २०२२ मध्ये प्रोजेक्टच्या कामानिमित्त इम्रानने विद्यार्थिनीला तो राहत असलेल्या रामानंद नगर स्टॉप जवळील खोलीवर बोलाविले. त्याठिकाणी असलेल्या इम्रानचा मित्र इक्बाल याच्यासोबत ओळख करून दिल्यावर तो निघून गेला. काही वेळाने इम्रानने विद्यार्थिनीसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न करीत सेल्फी काढले. विद्यार्थिनीने ते डिलीट करण्याचे सांगितले असता त्याने काही होत नाही म्हणून नकार दिला.

तीन दिवसांनी पुन्हा त्याने विद्यार्थिनींना फोन करून भेटण्यास बोलाविले. तिने नकार दिला असता त्याने फोटो आई – वडील, मित्र मैत्रिणींना आणि इतरत्र व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलगी भेटायला गेली असता त्याने जबरदस्ती तिच्यावर अत्याचार केला. ऑगस्ट – सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा त्याने मुलीला फोन करून अजिंठा चौफुली जवळील एका हॉटेलवर भेटण्यास बोलाविले. मुलीने नकार दिला असता गेल्यावेळी आपल्या संबंधांचे फोटो माझा मित्र इकबाल याने काढले असून ते त्याने दाखविले. तेव्हा देखील त्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केला. हळूहळू विद्यार्थिनीने त्याच्याशी संबंध तोडत त्याचा क्रमांक ब्लॉक केला. तरी देखील त्याने इतर क्रमांकावरून त्रास देणे सुरूच ठेवले होते.

तू माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी तो नेहमी धमकी देत होता. १३ ऑगस्ट २०२३ पासून त्याने पुन्हा फोटो, मेसेज करून धमकविण्यास सुरुवात केली. त्रास असह्य झाल्याने तरुणीने घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणीने तिच्या भावाला प्रकार सांगितल्यावर प्रकार उघड झाला आणि रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंद नगर पोलिसात रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलिसात इमरान शब्बीर मन्यार रा.साक्री ता.धुळे, इक्बाल खान रा.परभणी दोघे ह.मु. आदर्श नगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी ३ ते ४ मुली पीडित असण्याची शक्यता व्यक्त होत असून इम्रान याच्याकडून ४ मोबाईल, एक लॅपटॉप हस्तगत केला असल्याची माहिती आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.