जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२४ । पंधरा दिवसांपूर्वी जीएमसी रुग्णालयात शस्त्रक्रिये दरम्यान ६१ वर्षीय महिलेच्या शरीरात तार राहून गेल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. रुग्णालयाच्या या कारभाराबद्दल वृद्धेच्या नातेवाइकांनी रविवारी रात्री संताप व्यक्त केला. बेबाबाई नारायण गोसावी (वय ६१, रा. आव्हाणी, ता. धरणगाव) असे महिलेचे नाव आहे. बेबाबाई यांच्या कमरेच्या बॉलची शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु शस्त्रक्रिया केल्यानंतर शरीरात टाकलेला तार काढतांना अडकून गेल्याचा धक्कादायक प्रकार एक्स-रे मध्ये उघडकीस आला.
आव्हाणी येथील समाधान गोसावी हे सेंट्रींग काम करुन उदरनिर्वाह करतात त्यांच्या वृद्ध आईला कमरेचा त्रास होत असल्याने जीएमसी रुग्णालयात दाखल केले होते. उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयासंबंधी आजार असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी २८ मे पर्यंत थांबावे लागले.
शस्त्रक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक तार बेबाबाई यांच्या शरीरात टाकलेला होता. तार काढताना तुटल्यामुळे तो तसाच राहून गेला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील वृद्ध महिलेला त्याचा त्रास होत असल्याने २९ मे रोजी त्यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या भागाचा एक्सरे काढण्यात आला. तेव्हा तो तार दिसून आला. तार काढण्यासाठी बेबाबाई यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.