गुरूवार, सप्टेंबर 14, 2023

धक्कादायक ! ९वीच्या विद्यार्थ्याला शिक्षक आणि मुख्याध्यापकाने बेदम बदडले, शाळेतूनही काढले

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । बोदवड शहरातील चंद्रकांत हरी बढे उर्दू शाळेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील मुलांसोबत भांडण केल्याच्या कारणावरून नववीच्या विद्यार्थ्याला शिक्षक आणि मुख्याध्यापकाने बेदम बदडले. इतकेच नव्हे तर त्याला शाळेतून काढून टाकले. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?
बोदवडच्या चंद्रकांत बढे उर्दू शाळेत शेख तन्वीर शेख शरीफ मणियार (१४) हा नववीत शिक्षण घेत आहे. २४ ऑगस्ट रोजी तनवीरचे शाळेतील मुलांसोबत भांडण झाले. या कारणावरून शिक्षक अत्तर उल्ला खान शाहीद उल्ला खान (रा. मलकापूर) यांनी त्यास मुख्याध्यापक नदीम खान (रा. भुसावळ) यांच्या कार्यालयात नेलं.

या वेळी तन्वीर यास शिवीगाळ करून चापटबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. मारहाणीच्या घटनेनंतर २९ ऑगस्टला तन्वीर शाळेत गेला. मात्र, त्याला शाळेत जाण्यास उशीर झाल्याने मुख्याध्यापक कार्यालयात अत्तर उल्ला खान व मुख्याध्यापक नदीम खान यांनी पुन्हा लोखंडी पाइप व बुक्क्यांनी मारहाण केली. सोबत शाळा सोडल्याचा दाखला देऊन त्याला घरी पाठवले. त्यामुळे तन्वीरच्या वडिलांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.