चाळीसगावात मनुष्याचा अर्धवट पंजा आढळल्याने खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । चाळीसगाव शहरातील सुवर्णाताई नगरातील कचरा डेपोमध्ये मनुष्याचा उजव्या पायाचा अर्धवट पंजा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सय्यद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये मनुष्याच्या उजव्या पायाचा अर्धवट पंजा पुढील भाग शाबूत असलेला आढळून आला आहे. दोन पंचांसमक्ष पंचनामा करून वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. हा पंजा शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे रिपोर्टसह परीक्षणासाठी पाठविण्यात आला. चाळीसगाव शहर पोलिसात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

सुवर्णाताई नगरातील कचरा डेपोमध्ये मानवी पायाचा पंजा जळालेल्या अवस्थेत कसा आला? हा पंजा कुणाचा? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत.