⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

कोरोना योद्ध्याच्या कुटुंबाला मिळाला ५० लाखाचा धनादेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । यावल नगर पारिषदेकडून सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाची दिव्यांगासाठी ५ टक्के रक्कम वितरण करण्यात आली. तसेच येथील ग्रामीण रूग्णालयात औषध निर्माण विभागातील कर्मचारी कोरोना योद्धा सूर्यकांत पाटील यांच्या वारसांना ५० लाखांचा सानुग्रह अनुदान निधीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

येथील नगरपरिषदेकडून शहरातील २७९ दिव्यांग बांधवांना आर्थिक वर्ष २०२१–२२ अंतर्गत पाच टक्के निधीची तरतूद करण्यात आली होती. हा निधी ५ लाख ४ हजार ५०० रूपये इतका होता. तर गेल्या आर्थिक वर्षातील अनुशेष रक्कम २ लाख ८२ हजार इतकी होती. एकूण ७ लाख ८६ हजार ५०० इतकी रक्कम दिव्यांगांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. यात दिव्यांगांच्या दिव्यांग प्रमाणपत्रानुसार प्रत्येकी अडीच हजार तर काहींना साडेतीन हजार रूपये वितरीत करण्यात आले. तसेच ग्रामीण रूग्णालयात औषध निर्माता म्हणून कार्यरत असलेले सुर्यकांत धरमसिंग पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोना काळात त्यांनी शहरात सेवा दिली होती. पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग, मुख्याधिकारी मनोज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल नितिन सुतार यांनी सूर्यकांत पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील यांना ५० लाखांचा धनादेश सुपूर्द केला. या वेळी लेखापरीक्षक शरद पाटील, स्थापत्य अभियंता योगेश मदने, शिवानंद कानडे उपस्थित होते.