जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरातील ३३ वर्षीय विवाहित आपल्या सहा वर्षीय मुलीसह बेपत्ता झाली. विवाहिता आपल्या मुलीसह सोमवारी जळगाव जाण्यासाठी यावल हुन निघाली होती. मात्र ती तिकडे न पोहोचल्याने सर्वत्र शोध घेतला असता मिळून न आल्याने यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरावरील पुजारी त्रिभुवनदास लक्ष्मण बैरागी यांच्या पत्नी ज्योती त्रिभुवनदास बैरागी व मुलगी त्रिशिका पवार (वय ६) हे दोघं सोमवारी यावल येथुन जळगाव जाण्यासाठी दुपारी साडेबारा वाजेला बस स्थानक वर आल्या होत्या. मात्र, सायंकाळ झाली तरी त्या जळगाव येथे नातेवाईकांकडे न पोहचल्याने दोघांचा सर्वत्र शोध घेतला असता कुठेच मिळून न आल्याने बुधवारी यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान एसटी वाहकांकडे चौकशी केली असता बेपत्ता झालेली विवाहिता शेगाव जाण्यासाठी कसे जावे लागते असे विचारत असल्याचे वाहकाने सांगितले. पुढील तपास सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.