जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२४ । भुसावळ विभागातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ९० फेऱ्यांसाठी विशेष गाड्यांची सेवा सुरू करीत असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
ट्रेन क्रमांक ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष ही पुन्हा १५ फेब्रुवारीपासून ३० मे पर्यंत (३० फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात येत आहे. ट्रेन क्रमांक ०२१४० नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष ही १७ फेब्रुवारी ते १ जून (३० फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात येत आहे.
ट्रेन क्र. ०२१४४ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष अधिसूचित ही १५ फेब्रुवारीपासून ३० मे २०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत, ०२१४३ पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष १६ फेब्रुवारीपासून ३१ मे २०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात येत आहे.
या गाड्यांची वेळ, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणतेही बदल नाहीत. आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक ०२१३९/०२१४० आणि ०२१४४/०२१४३ च्या सर्व वाढीव फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग मंगळवारपासून (ता.१३) सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे रेल्वेतर्फे कळविले आहे.