जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२४ । फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवाती पासूनच जळगावातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली असून कमाल तापमान वाढल्याने उन्हाचा चटका बसत आहे. जळगाव शहराचे कमाल तापमान गेल्या तीन दिवसांपासून ३२ अंशांवर स्थिरावले आहे. तापमानातील चढ-उतारामुळे रात्री कधी थंडीचा गारठा तर कधी उकाडा वाढला आहे.
वाऱ्याचा वेग ताशी ८ ते १५ किलोमीटरच्या दरम्यान आहे. आकाशही गेल्या दोन दिवसांपासून निरभ्र आहे. त्यामुळे साधारणतः या आठवड्याच्या शेवटी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात येते आहे, दरम्यान, गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३५ अंशांच्या पुढे होते. यंदा ते सध्या स्थिर आहे.
दरम्यान दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यातील काही भागातही पाऊस झाला आहे. या वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.