जळगाव लाईव्ह न्यूज । 7 फेब्रुवारी 2024 । पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली वर्षा अर्थात प्रिया मराठेने येथील ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक केला. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, सचिव एस. बी. बाविस्कर, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम व खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी डि.ए. सोनवणे विनोद कदम यांनी प्रिया मराठेचे स्वागत केले. मंगळवारी मंदिरात भाविकांची झालेली गर्दी तसेच येथील स्वच्छता, पारदर्शकता भक्तिमय वातावरण व निसर्गमय परिसर पाहून ती भारावून गेली.
तीला पाहताच अनेक भाविकांनी तिच्या समवेत सेल्फी व फोटो काढले . प्रियाने कोणतेही आढेवेढे घेतले नाही. सर्वांसोबत फोटो काढले. काहींशी दिलखुलास संवादही साधला. तिचा एकूणच वावर सामान्य भाविकासारखाच होता . प्रथितयश अभिनेत्री असल्याचा कोणताही आविर्भाव किंवा बडेजावपणा नव्हता. महाप्रसादाचा आस्वादही तीने सर्वांसाठी असलेल्या प्रसादलयात भाविकांसोबत घेतला. अभिषेकही तीने सामुहिकरित्याच केला, हे विशेष.
प्रिया मराठेने सुप्रसिद्ध ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेबरोबरच या सुखांनो या, तुझेच मी गीत गात आहे, तू तिथे मी, येऊ कशी तशी मी नांदायला या मराठी मालिकेत तसेच विघ्नहर्ता महागणपणी आणि किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी या मराठी चित्रपटातही काम केले आहे.
मंदिरातील नियोजन वाखाण्याजोगे आहे. येथील स्वच्छता, निसर्गरम्य परिसर व भक्तिमय वातावरण पाहून मनाला आल्हाददायक वाटले. विशेष येथील महाप्रसाद अतिशय चविष्ट आहे.
-प्रिया मराठे, अभिनेत्री