जळगाव लाईव्ह न्यूज । 7 फेब्रुवारी 2024 । जळगाव जिल्ह्यात कापूस हंगाम केव्हाच संपला तरी पण कापसाला भाव नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच पडून आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाला मागणी नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही.
यंदा ‘सीसीआय’चे केंद्र सुरू होऊनही कापसाची आवक वाढलेली नाही. शासकीय कापूस खरेदी ७ हजार २० रुपयांनी होत आहे.तर व्यापारी कापसाला पाच हजार ते ६ हजार ८०० चा दर देत आहेत. गतवर्षी आक्टोबर ते सप्टेंबर या कापूस वर्षात १९ लाख गाठी तयार करण्यात आल्या. यंदा आतापर्यंत केवळ सात लाख गाठींची निर्मिती झाली आहे. डिसेंबरमध्ये ‘सीसीआय’ने कापूस खरेदी काही केंद्रावर सुरू केली असली तरी विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’ केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. ज्या शेतकऱ्याला गरज होती त्यांनी व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात कापूस विकला. सध्या व्यापारी पाच हजार ते ६८०० दर देत आहेत. तरीही कापसाची आवक अतिशय कमी आहे.
२०२३ च्या पावसाळ्यात पावसाने जूनच्या शेवटी हजेरी लावली. जुलैला तो चांगला बरसला. मात्र ऑगस्टमध्ये पुन्हा मोठा ब्रेक दिल्याने कापसाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट झाली. त्यातही काही वेळा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा कापसाचा दर्जा खालावला. सुरवातीला सात ते नऊ हजारांपर्यंत भाव कापसाला मिळाला.२०२१ मध्ये पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल १० ते ११ हजार रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकरी मालामाल झाले होते.
मात्र मागील दोन वर्षांपासून कापसाला चांगला भाव नाहीय. अद्यापही कापसाचा भाव वाढेल, या आशेवर शेतकरी आहेत. मात्र, फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी चांगल्या प्रतिचा कापूस भाव पाच हजार ते ६८०० रुपयांवरच आहे.