जळगावसह राज्यात हुडहुडी वाढली ; गारठा आणखी वाढणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२३ । डिसेंबर महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे.जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा घसरल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. आठवड्याच्या अखेरपर्यंत थंडीची ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. मैदानी भागातून येणाऱ्या थंड उत्तरेकडील वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या हवामानात बदल झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात गुलाबी थंडी पडली आहे. आजही राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे. राज्यातील निफाड, धुळे, जळगाव भागांमध्ये तापमानाचा पारा 10 अंशांपर्यंत घसरला आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण सोमवारी पूर्णपणे निवळले. रविवारी १२.६ अंशांवर असलेले किमान तापमान सोमवारी ९.६ अंशांवर आले. अर्थात, एकाच दिवसांत तीन अंशांने तापमान घसरले. त्यामुळे पहाटे गारठा जाणवत होता.
शहरात सकाळी आठ वाजता धुक्यामुळे दृष्यमानता दोन किमीपर्यंत होती. दरम्यान पहाटे थंडी वाढलेली असली तरी दुपारी स्वच्छ सुर्यप्रकाशामुळे कमाल तापमान ३१.१ अंशावर पोहोचले होते. यंदा डिसेंबर महिन्याच्या अखेर व जानेवारीच्या सुरवातीला किरकोळ पावसाची शक्यता आहे. धुक्याची तीव्रताही वाढेल. पुढील चार दिवसात तापमानात आणखी घट होऊन गारठा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी सांगितले.