राज्य बालनाट्य स्पर्धा समन्वयकपदी रंगकर्मी ईश्वर पाटीलांची नियुक्ती
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२३ । राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होत आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार असून या स्पर्धेमध्ये एकूण २८ संघांचा सहभाग असणार आहे. दरम्यान जळगाव केंद्राचे राज्य बालनाट्य स्पर्धा समन्वयक म्हणून रंगकर्मी ईश्वर पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
ईश्वर पाटील हे २०१३ पासून नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्याला प्रशांत दामले यांच्याकडे अभिनयाचे प्रशिक्षण घेतले असून इंद्रावती नाट्य समिती, मध्यप्रदेश येथे काही काळ नाट्य क्षेत्रात काम केले. ईश्वर पाटील हे भारतेंदू नाट्य अकादमी, लखनऊ येथून प्रशिक्षित आहेत. २०२१ ते २०२३ च्या बॅचचे विद्यार्थी राहिले आहेत. तिथे त्यांच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याचे कौतुकही झाले आहे.
२० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याचे समन्वयक ईश्वर पाटील यांनी सांगितले आहे. राज्य बालनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.