अंकलेश्वर-बर्हाणपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा! ‘या’ शिवारातील जमीनीचे भूसंपादन करण्यात येणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२३ । महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांना जोडणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते बर्हाणपूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला यासाठी भूसंपादनाचे नोटीस आज निघाले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त लाभणार आहे.
तीन राज्यांना जोडणार्या तळोदा ते बर्हाणपूर या 233 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 बीच्या चौपदरीकरणाचा डिपीआरला एप्रिल २०२३ मध्ये मंजूरी देण्यात आली होती. यावेळी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केली होती. सध्या हा राष्ट्रीय महामार्ग असला तरी तो फक्त दुपदरी आहे. त्यात या महामार्गावर अत्यंत मोठ-मोठे खड्डे पडले असून यामुळे वाहनधारकांची वाहने व हाडे खिळखिळी झाली आहे. यावर झालेल्या अपघातांमध्ये अक्षरश: शेकडो जीव गेलेले आहेत.
या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. या मार्गावरील चोपडा ते बर्हाणपूरचा भाग हा केळी पट्टा असल्याने केळीच्या वाहतुकीसाठी अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत असल्याने देखील शेतकरी नाराज होते. अशातच आज जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाची नोटीस जारी केली आहे. या अनुषंगाने चोपडा, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील पुढील गावांच्या शिवारातील जमीनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.
चोपडा तालुक्यातील या गावांचा समावेश
१) धानोरे प्र. चोपडा, २) गलंगी, ३) वेळोदा, ४) गलवाडे, ५) हातेड खु., ६) हातेड बु., ७) काझीपुरा, ८) चहार्डी, ९) हिंगोणे, १०) चुंचाळे, ११) चोपडा | अकुलखेडे, १२) चोपडा शहर, १३) खरग, १४) रुखणखेडे प्र.चोपडा, १५) अंबाडे, १६) नारोद, १७) बोरखेडे, १८) माचले, १९) वर्डी, २०) मंगरुळ, २१) अडावद, २२) लोणी, २३) पंचक, २४) धानोरे प्र. अडावद या गावांचा समावेश आहे.
यावल तालुक्यातील या गावांचा समावेश
१) चिंचोली, २) कासारखेडे, ३) , ४) किनगाव खु., ५) किनगाव बु., ६) गिरडगाव, ७) चुंचाळे, ८) वाघोदे, ९) साकळी, १०) वढोदा प्र. यावल, ) ११) शिरसाड, १२) विरावली बु., १३) यावल ग्रामिण, १४) यावल शहर, १५) चितोडे, १६) सांगवी बु., १७) अदट्रावल, १८) भालोद, १९) हिंगोणे, २०) हंबर्डी, २१) न्हावी प्र. यावल, २२) फैजपूर ग्रामिण, २३) फैजपूर शहर या गावांमधून हायवे जाणार आहे.
रावेर तालुक्यातील या गावांचा समावेश
१) कोचुर खुः, २) रोझोदे, ३) बोरखेडे सिम, ४) कोचुर बु., ५) वाघोदा बु. ६) चिनावल, ७) वडगाव, ८) निंभोरे बु. ९) विवरे खु., १०) विवरे बु., ११) निंबोल, १२) रेंभोटे, १३) अजंदे, १४) नांदुरखेडे, १५) सांगवे, १६) विटवे, १७) बोहर्डे, १८) निंभोरे सिम, १९) थेरोळे, २०) धुरखेडे या गावांमधून भूसंपादन करण्यात येईल. तर मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी, धामंदे, बेलखेडे, नरवेल आणि अंतुर्ली या गावांमधून हायवे जाणार असल्याचे या नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे. २४ जानेवारी २०२४ पर्यंत भूसंपादनाची कामे पूर्ण करण्यात येणार असून यानंतर प्रत्यक्षात हायवेच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
हा महामार्ग गुजरातमध्ये 60 किमी, नंदुरबार जिल्ह्यातून 58 किमी, धुळे जिल्ह्यातून 48 किमी आणि जळगाव जिल्ह्यातुन या रस्त्याची लांबी 120 किलोमीटर असणार आहे.