जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२३ । सध्या जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा सुरू असून या कथेसाठी कान्याकोपऱ्यातून हजारो-लाखोंच्या संख्येने भाविक येत आहे. ही कथा प्रत्यक्षपणे श्रवण करण्यासाठी भाविक विविध वाहनांद्वारे जात असून यातच एसटी महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी विशेष बस सोडल्या आहेत. परंतु बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांनी चक्क रांग लावली होती. जणू हे मंदिर आहेत की बस स्थानक असा प्रश्न निर्माण होत होता.
ही रांग बस स्थानकापासून सुरू होत थेट स्थानकाबाहेर निघून स्वातंत्र्य चौकापर्यत लागली होती. असा अचानक झालेला बदल पाहून रस्त्याने जाणारे कुतूहलाने पाहत होते. चौकशी केली असता या शिस्तबध्द रांगेचा उलगडा झाला तो शिवमहापुराण कथेचा.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद एस.टी. महामंडळाने खरे करून दाखवले. रांगेचा फायदा सर्वांना या म्हणीनुसार एस.टीचे अधिकारी, पोलीस व होमगार्ड यांनी ही शिस्त लावली.
कथा प्रारंभाच्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरपासूनच जळगाव बस स्थानकातून विशेष बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. यात 6 तारखेला जळगाव आगाराने 152 व इतर आगाराच्या 52 अशा एकूण 204 फेऱ्या झाल्या. 7 तारखेला जळगाव आगाराने 104 तर इतर आगाराच्या 75 अशा एकूण 179 बस फेऱ्या झाल्या आहेत. तसेच 8 तारखेला जळगाव आगाराने 133 तर इतर आगाराच्या 114 बस फेऱ्या अशा एकूण 247 बस फेऱ्या झाल्या आहेत. तर शनिवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून दुपारी दिड वाजेपर्यंत जळगाव आगाराने 72 व इतर आगारांच्या बसेस यांनी 65 फेऱ्या केल्या होत्या.