जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२३ । शेतकऱ्यांनी शेतीत कृषी संलग्न व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करावा. युवकांनी शेतीकडे उद्योग – व्यवसाय म्हणून पाहिल्यास शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद युवकांमध्ये असल्याचे प्रतिपादन कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी आज येथे केले.
जळगाव तालुक्यातील शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या प्रक्षेत्रांना कृषी आयुक्तांनी आज भेटी दिल्या त्यावेळी ते बोलत होते. सावखेडा खुर्द शिवारातील श्रीमती सुशिलाबाई आत्माराम साळुंखे यांच्या शेतातील निर्यातक्षम केळी उत्पादन, तसेच त्यांनी बी.आय. (बड इंजेक्शन) तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन केलेल्य केळी पीक प्रक्षेत्रास भेट देऊन तांत्रिक व कमी खर्चाचे तंत्रज्ञान याबाबतची माहिती यावेळी कृषी आयुक्त डॉ .गेडाम यांनी जाणून घेतली.
कृषी आयुक्तांनी यावेळी मौजे करंज शिवारातील धोंडीराम सपकाळे यांनी लागवड केलेल्या नवीन कांदे बाग प्रक्षेत्रास टिश्यू कल्चर तंत्रज्ञान व पारंपारिक कंद लागवड या बाबत उत्पन्नात होत असलेले फरक, वेळेची बचत आदी बाबत चर्चा केली. मौजे कानळदा कृषी यांत्रिकीकरण उपभियान योजने अंतर्गत श्रीमती आशाताई अशोक राणे यांनी खरेदी केलेल्या हार्वेस्टर या यंत्राची पाहणी करून माहिती जाणून घेतली. तसेच याच ठिकाणी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत गोपाल सपकाळे यांनी उभारलेल्या सद्गुरु केळी प्रक्रिया उद्योग येथे भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली.
यावेळी उपस्थित असलेल्या युवा शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना युवकांनी कृषी संलग्न व्यवसायासोबतच अन्न प्रक्रिया उद्योग व कृषी निर्यातीत आपले भवितव्य घडवल्यास शेती क्षेत्रात निश्चितचपणे परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी डॉ.प्रविण गेडाम यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी युवकांनी देखील पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कृषीभूषण अनिल सपकाळे, मोहनचंद सोनवणे, राजेंद्र पाटील, ॲड.हर्षल चौधरी, किशोर पाटील, प्रदिप पाटील, डॉ.सत्वशील जाधव,संजय पाटील, संजय सपकाळे, किरण साळुंखे व शेतकरी उपस्थित होते.