जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील सामाजिक विशेष सहाय्याच्या राज्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ६३४ लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी १३२ कोटी २३ लाख १६ हजार १९० रूपयांचे अनुदानाचे तालुक्यांना वितरीत केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जातीच्या १२००८ लाभार्थ्यांना ५ कोटी २० लाख ८५ हजार १०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. याच योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील ६९१९२ लाभार्थ्यांना ३० कोटी २४ लाख २४ हजार १०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या ९०१५ लाभार्थ्यांना ४ कोटी १ लाख ७२ हजार ७०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या १९६५२ लाभार्थ्यांना ७ कोटी ६९ लाख १४ हजार ९०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. याच योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील १५३८२० लाभार्थ्यांना ७८ कोटी ९५ लाख ७० हजार ७०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या १६५९९ लाभार्थ्यांना ६ कोटी ११ लाख ४८ हजार ६०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, एचआयव्ही, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत ६५ वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या अथवा रूपये २१ हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीना निवृत्ती वेतन देण्यात येत असते. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२३ पर्यंतचा लाभ देण्यात आला आहे. आज वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीतून ऑक्टोबर २०२३ महिन्याचे वेतन दिले जाणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना एक हजार रुपये देण्यात येत होते. जुलै महिन्यापासून आता दीड हजार रुपये अनुदान मिळत आहे.