जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२३ । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होत असतानाचे दिसत आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ऑक्टोंबर हिटच्या तडाख्याने नागरिक घामाघूम झाले होते. त्यानंतर आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र यातच पुणे हवामान खात्याने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.पुणे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस हा पाऊस असणार आहे. यात जळगाव जिल्ह्यात देखील तुरळक पावसाचे संकेत हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहे.
या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर तमिळनाडूवर वाऱ्याची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आता दक्षिण – पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनारपट्टीलगत आहे.
आठ नोव्हेंबर रोजी त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून मेघर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचवेळी राज्यातील अन्य भागात हवामान अशंत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
आधीच यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे रब्बीतील पिकांच्या सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा नाही. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट आहे. आता अवकाळीचे संकट आल्यामुळे शेतकरी कोंडीत अडकला आहे. मात्र हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पिके निघाली नाही, त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.